शेवटच्या षटकापर्यंत उत्सुकतेच्या परमोच्च शिखरावर गेलेला निदाहास चषकातील सामना बांगलादेशच्या पारड्यात विजयी मोहोर टाकणार तोच दिनेश कार्तिकच्या अफलातून षटकाराने होत्याचं नव्हतं केलं. बांगलादेशच्या संघासाठी हा एक धक्काच होता. १९ व्या षटकापर्यंत शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला निदाहास चषक खुणावत होता. पण, त्यांचं हे स्वप्न भारताच्या दिनेश कार्तिकने पूर्ण होऊ दिलं नाही. श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या, उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात मैदानात उपस्थित असलेल्या क्रीडारसिकांनी त्यांच्या वर्तणुकीमुळे आपली निराशा केल्याची प्रतिक्रिया बांग्लादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने माध्यमांशी संवाद साधताना दिली. अंतिम सामन्यामध्ये चर्चेत असणारा नागिन डान्स आणि मैदानावर उपस्थित रसिकांकडून केली गेलेली विदुषकी कृत्य या साऱ्यामुळे आपली निराशा झाल्याचं शाकिबने सांगितलं.

सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शाकिबने हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. आमच्या संघाने इथल्या क्रीडारसिकांकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षाच केली नव्हती, असं त्याने यावेळी स्पष्ट केलं. ‘इथले क्रीडारसिक आम्हाला पाठिंबा देतील अशी अपेक्षाच आम्ही केली नव्हती किंबहुना या गोष्टीवर आम्ही जास्त लक्षही दिलं नव्हतं. पण, त्यांनी खिलाडू वृत्तीने आमच्या संघालाही प्रोत्साहन दिलं असतं, पाठिंबा दिला असता तर चांगलं झालं असतं. या अशा गोष्टी होतच असतात. पण, त्यामुळे कोण आमच्या संघाला पाठिंबा देतंय आणि देत नाही, याविषयी फारशी काळजी करण्याचं कारण नाही. आमच्यासाठी चांगल्या आणि दर्जेदार खेळाचं प्रदर्शन करणं हीच बाब सर्वाधिक महत्त्वाची होती, ज्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं’, असं तो म्हणाला.

निदाहास चषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी मैदानावर उपस्थित क्रीडारसिकांनी नागिन डान्स करत बांगलादेशच्या संघाला चेतवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यादरम्यान काही बांगलादेशी चाहत्यांना वगळता सर्वाधिक चाहते भारतीय संघालाच पाठिंबा देत असल्याचंही पाहायला मिळालं.

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

नेमकं काय आहे नागिन डान्स प्रकरण?
निदाहास चषकाच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला. यावेळी बांगलादेश संघातील मुशफिकुर रहमान हा खेळाडू संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. रहमानने त्याच्या या विजयाचा आनंद मैदानावरच नागिन डान्स करत केला. शेवटची धाव घेतल्यानंतर तो आवेगात ओरडू लागला आणि नंतर त्याने नागिन डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला. बांगलादेशच्या संघाला विजयासाठी १२ रन हवे होते. मुस्ताफिजूर रहमान शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आऊट झाला. याच विकेट वरून दोन्ही बांगलादेशआणि श्रीलंकेच्या फलंदाजांमध्ये वादावादी सुरु झाली. कारण २० व्या षटकाचा पहिला चेंडू बाऊन्सर होता पण तो वाइड दिला गेला नाही. तसेच दुसरा चेंडू जास्त उसळी घेणार होता. या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात मुस्ताफिजूर रहमान बाद झाला. यानंतर लगेचच वादाला तोंड फुटले आणि दोन्ही संघात राडा आणि बाचाबाची झाली होती. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या राड्याच्या आणि नागिन डान्सच्याच चर्चा पाहायला मिळाल्या. श्रीलंकन क्रीडारसिकांनी बांग्लागदेशच्या खेळाडूंच्या असभ्य वर्तनाविषयी निराशा व्यक्त करत अंतिम सामन्याच्या वेळी त्यांच्याच नागिन डान्सने संघाचा वचपा काढल्याचं पाहायला मिळालं.