देशात अठराविश्वे दारिद्रय़, अंतर्गत अशांतता आणि स्थलांतर यामुळे सातत्याने धुमसत असलेल्या बांगलादेशमध्ये प्रथमच क्रिकेटमुळे आनंदाचे भरते आले आहे. देशामध्ये जणू संजीवनी संचारल्यासारखे वातावरण आहे. क्रिकेटमध्ये तीन महासत्तांना त्यांनी मायदेशात धूळ चारली आहे. पाकिस्तान, भारत या दोन विश्वविजेत्यांसह सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेलाही पराभूत करून त्यांनी इतिहास रचला. अगदी आतापर्यंत लिंबू-टिंबू म्हणून गणल्या जाणाऱ्या बांगलादेशकडे पाहून ही लेकरे उदंड झाल्याचीच भावना क्रिकेट जगतामध्ये आहे.
बांगलादेशच्या संघात पूर्वीपासूनच गुणवत्ता होती, अगदी अक्रम खान त्यांचे नेतृत्व करत असल्यापासून. त्यावेळी त्यांनी एखाद्-दुसरा विजय मिळवलाही होता. पण केवळ नशिबाने त्यांना हे विजय मिळाल्याचे बोलले जात असे, कारण त्यांच्या गाठीशी अनुभव जास्त नव्हता. परंतु विजय मिळत नसला तरी पराभवातून ते शिकत गेले आणि या पराभवाच्या काळ्याकुट्ट अंधारातून त्यांनी विजयाचा मार्ग साकारला. आता हा नुसता मार्ग राहिला नसून त्याचे रूपांतर महामार्गामध्ये झाले आहे.
पूर्वी बांगलादेशचा दौरा हा एखाद्या लॉटरीसारखा वाटायचा. पराभवाच्या गर्तेतून विजयाच्या लाटेवर स्वार व्हायचे असेल किंवा एखाद्या खेळाडूला फॉर्मात यायचे असेल तर सर्वात सोपा पर्याय म्हणून बांगलादेशच्या दौऱ्याची निवड केली जायची. २००४-०५ मध्ये त्यांनी मायदेशात झिम्बाब्वेवर ३-२ असा पहिला मालिका विजय मिळवला. त्यानंतरच्या वर्षी त्यांनी केनियाला पराभूत केले. २००८-०९ पर्यंत बांगलादेश अशाच लहान संघांवर मालिका विजय मिळवत होता, पण मोठय़ा संघांपुढे त्यांची डाळ काही शिजत नव्हती. २००९ साली त्यांनी वेस्ट इंडिजच्या संघावर ३-० असे निर्भेळ यश मिळवले. वेस्ट इंडिजचा संघ त्यावेळी कामगिरीत दरिद्रीच होता. त्यानंतर २०१० साली त्यांनी खऱ्या अर्थाने मोठे यश मिळवले ते न्यूझीलंडला धूळ चारत. ब्रेंडन मॅक्क्युलम, डॅनियल व्हेटोरी, कायले मिल्स, टीम साऊथीसारखे नावाजलेले खेळाडू संघात असताना त्यांना ४-० असे पराभूत करणे हा मोठा विजय होता. पण या विजयानंतर पुन्हा एकदा मोठय़ा संघाला पराभूत करण्यासाठी बांगलादेशला तब्बल २०१५ पर्यंत वाट पाहावी लागली. या चार वर्षांमध्ये त्यांनी न्यूझीलंड, वेस्ट इंडिजसारख्या संघांना मायदेशात मालिका विजयापासून दूर लोटले होते. गेल्या ५-६ वर्षांमध्ये या दोन्ही संघांना बांगलादेशला पराभूत करता आलेले नाही.
विश्वचषकातही बांगलादेशच्या संघाने चमकदार कामगिरी केली. महमुदुल्लाने सलग दोन शतके लगावत देशाचे नाव उंचावले. त्याच्या एका शतकाच्या जोरावर बांगलादेशने इंग्लंडला पराभूत करत साऱ्यांना धक्का दिला होता. महमुदुल्लाच्या १०३ धावांच्या जोरावर बांगलादेशने २७५ धावा केल्या आणि रुबेन होसेनच्या चार विकेट्समुळे इंग्लंडचा डाव २६० धावांमध्ये रोखला.
विश्वचषकानंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला आणि पराभव स्वीकारून त्यांना माघारी परतावे लागले. बांगलादेशला हा विजय काही नशिबाने मिळाला नव्हता. पाकिस्तानवर ३-० असे निर्भेळ यश मिळवणे सोपे नक्कीच नव्हते. पाकिस्तानला धूळ चारल्यावर भारतीय संघही बांगलादेशात जाऊन भळभळती जखम घेऊनच मायदेशी परतला. पहिल्याच सामन्यात त्यांनी भारताविरुद्ध तीनशे धावांचा टप्पा गाठला. मुस्तफिझूर रहमान या विशीतल्या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजाने भारताची त्रेधा उडवली. दुसरा सामना हा भारतासाठी ‘करो या मरो’ असाच होता. पण मुस्तफिझूर पुन्हा एकदा भारतीय संघावर भारी पडला, या सामन्यात तर तब्बल सहा भारतीय फलंदाजांना माघारी पाठवत त्यांचे कंबरडेच मोडले. फक्त चार फलंदाजांच्या मोबदल्यात त्यांनी आव्हान पार करत एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, धोनी, रवींद्र जडेजा अशी एकामागून एक नावं घ्यावी तेवढी थोडी.. पण भारताच्या या ताफ्याला नेस्तनाबूत करत त्यांनी २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. मुस्तफिझूर हा या मालिकेचा नायक ठरला. तीन सामन्यांमध्ये त्याने भारताचे १३ बळी मिळवले होते.
भारतानंतर त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये अव्वल असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेलाही धक्का दिला. पहिला सामना आफ्रिकेने जिंकला खरा, पण त्यानंतरचे दोन सामने त्यांच्यासाठी धोकादायक ठरले. ही मालिका गाजवली ती २३ वर्षीय डावखुरा फलंदाज सौम्या सरकारने. दुसऱ्या सामन्यात नाबाद ८८ आणि तिसऱ्या सामन्यात ९० धावांची खेळी साकारत त्याने बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला. बांगलादेशने या दोन्ही सामन्यांमध्ये आफ्रिकेला १७० धावांचा पल्लाही गाठू दिला नाही. बांगलादेशकडे अनुभवी खेळाडू आणि जोशपूर्ण युवा खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. तमीम इक्बाल, शकिब अल हसन, मुशफिकर रहिम, महमुदुल्लाह आणि रुबेल होसेन या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर संघ उभा आहे. त्याला मुस्तफिझूर आणि सौम्या सरकारसारखे युवा खेळाडू चांगली साथ देत आहेत. आता बांगलादेश पूर्वीसारखा नक्कीच विजयासाठी सोपा देश राहिलेला नाही, तर ती आता धोक्याची घंटा ठरत आहे.
prasad.lad@expressindia.com