पदार्पणाची लढत म्हणजे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी दडपणाचा क्षण. मात्र बांगलादेशच्या तैजुल इस्लामने पदार्पणाच्या लढतीतच हॅट्ट्रिक घेत ऐतिहासिक विक्रम रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलावहिला खेळाडू ठरला आहे. तिनाशे पानयानगरा, नयम्बू आणि तेंदई चटारा यांना बाद करत तैजुलने हा विक्रम रचला. तैजुलने सात षटकात अवघ्या अकरा धावात ४ बळी घेतले. तैजुलच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय लढतीत ५ विकेट्सनी विजय मिळवला. २ बाद ९५ अशा सुस्थितीत असलेल्या झिम्बाब्वेचा डाव १२८ धावांतच आटोपला. तैजुलने ४ तर शकीब उल हसनने ३ बळी घेतले. महमदुल्लाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने हे लक्ष्य गाठले. तैजुलला सामनावीर तर मुशफकिर रहीमला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.