बार्सिलोना फुटबॉल क्लबने ला लिगामध्ये सोमवारी पिछाडीवरून मुसंडी मारताना डेपोर्टिव्हो अ‍ॅल्व्हेसवर २-१ असा विजय मिळवला. लुईस सुआरेझ आणि लिओनेल मेसी यांच्या प्रत्येकी एका गोलने बार्सिलोनाला हा विजय मिळवून दिला. बार्सिलोनाने २१ सामन्यांनंतर गुणतालिकेत ५७ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. डेपोर्टिव्होकडून जॉन गुडेट्टीने एकमेव गोल नोंदवला.

कॅम्प न्यू येथे झालेल्या या लढतीत पहिल्या सत्रात पाहुण्या डेपोर्टिव्होने वर्चस्व गाजवले. गुडेट्टीने २३व्या मिनिटाला गोल करताना डेपोर्टिव्होला आघाडी मिळवून दिली. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदने ३-० अशा फरकाने लास पल्मासवर विजय मिळवून बार्सिलोनावरील दडपण वाढवले होते. मात्र, मध्यंतरानंतर हे दडपण झुगारून बार्सिलोनाने दमदार पुनरागमन केले. सुआरेझने ७२व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला आणि त्यापाठोपाठ ८४व्या मिनिटाला मेसीने गोल करत बार्सिलोनाचा विजय पक्का केला. मेसीने ला लिगामध्ये फ्री किकवर थेट गोल करण्याची ही २१वी वेळ आहे. यापूर्वी रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने २००३-०४च्या हंगामात २० वेळा फ्री किकवर थेट गोल केला होता. बार्सिलोनाने या विजयासह लीगमधील सर्वाधिक २१ (१८ विजय व ३ अनिर्णीत) सामन्यांत अपराजित राहण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. पेप गॉर्डीओला यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोनाने २००९-१० च्या हंगामात १७ विजय आणि ४ अनिर्णीत निकालासह हा विक्रम केला होता.