रिअल माद्रिद व मँचेस्टर युनायटेड यांच्या यादीत
फुटबॉल विश्वातील दिग्गज क्लबपैकी एक असलेल्या बार्सिलोनाने पाच जेतेपदांना गवसणी घालून गेल्या हंगामात स्वप्नवत कामगिरी केली. केवळ जेतेपदाच्या बाबतीत बार्सिलोना मर्यादित न राहता एकूण मिळकतीतही त्यांनी गरुडझेप घेतली आहे. बार्सिलोनाने गेल्या हंगामात ५० कोटी युरोहून अधिक कमाई केल्याचा अहवाल ‘डेलॉइट’ या आर्थिक सल्लागार समितीने आपल्या ‘फुटबॉल मनी लीग’मध्ये छापला आहे.
सलग अकरा वर्षे माद्रिद कमाईच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. गेल्या हंगामात त्यांनी ५७ कोटी युरोची कमाई केली असून त्यापैकी २२.७ कोटी युरो हे व्यावसायिक महसुलातून मिळाले आहेत. २०१५च्या हंगामात बार्सिलोनाने ला लीगा, स्पॅनिश चषक आणि चॅम्पियन्स लीगसह फिफा क्लब विश्वचषक आणि युएफा सुपर चषक स्पध्रेचे जेतेपद पटकावले. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप घेत ५६ कोटी युरोची कमाई केली.
‘‘फुटबॉल मनी लीगमध्ये पहिल्यांदा अव्वल तीन क्लबची कमाई ५० कोटी युरोहून अधिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०१४-१५ या हंगामात बार्सिलोनाने केलेल्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर त्यांची आर्थिक प्रगती झाली. युरोपियन विजेत्या बार्सिलोनाने प्रक्षेपण, व्यावसायिक आणि सामन्यातील कमाईच्या बाबतीत आघाडी घेत मँचेस्टर युनायटेडला पिछाडीवर टाकत दुसरे स्थान पटकावले,’’ अशी माहिती ‘डेलॉइट’ क्रीडा व्यावसायिक गटाचे प्रमुख डॅन जोन्स यांनी सांगितले.
बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेप मारिया बाटरेमेऊ यांनी २०२१ पर्यंत अब्जावधी कमाई करण्याचा मानस गत आठवडय़ात बोलून दाखवला आहे. या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी ६० कोटी युरो खर्च करून कॅम्प नोऊ येथील स्टेडियमचे नूतनीकरण करण्याचे ठरवले आहे.

Untitled-1