चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत बार्सिलोनाचा प्रवेश हा जवळपास निश्चित आहे. तरीही बायर्न म्युनिकचे प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांनी बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लीग लढतीत बार्सिलोनाला कडवी लढत देण्याचा चंग बांधला आहे. बायर्न म्युनिक घरच्या प्रेक्षकांसमोर बार्सिलोनाला सलग आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असले तरी केवळ चमत्कारच त्यांना यश मिळवून देऊ शकतो.  
म्युनिक येथील अलाएंज अरेना येथे म्युनिक विरुद्ध बार्सिलोना ही लढत रंगणार आहे. मात्र, कॅम्प नोउ येथे झालेल्या पहिल्या लीग लढतीत बार्सिलोनाने ३-० असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीतील दावेदारी मजबूत केली होती. यामध्ये लिओनेल मेस्सीच्या दोन गोलचा समावेश होता. पहिल्या लीग लढतीत ३-० अशा पराभवानंतर कोणत्याही संघाने पुनरागमन करून अंतिम फेरी गाठलेली नाही. त्यामुळे म्युनिकसाठी हे एक आव्हानच असणार आहे.
‘‘ आम्हाला माहीत आहे की, हे आव्हान खडतर आहे. मात्र, आम्ही सहजा सहजी पराभव पत्करणार नाही,’’ असे मत म्युनिकचा आघाडीपटू थॉमल म्युलर यांनी व्यक्त केले. म्युनिकनेही कर्णधार बॅस्टियन श्वेइंस्टेगर याच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवण्याची आस ठेवली आहे. मात्र, त्यांचा हा आत्मविश्वास भ्रमनिरास करणारा असल्याचे चित्र सध्या डोळ्यांसमोर उभे आहे. जर्मन लीगचे जेतेपद पटकावल्यानंतर म्युनिकला सलग चार लढतींत पराभव पत्करावा लागलेला आहे आणि ११९१ सालानंतर सर्वाधिक  पराभव पत्करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.
बार्सिलोनाचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या चार सामन्यांत त्यांनी १९ गोल केले आहेत. डेव्हिड मोयेसच्या रिअल सोसिदाद संघाला २-० असे नमवून त्यांनी ‘ला लिगा’ जेतेपदाच्या उंबरठय़ापर्यंत झेप घेतली आहे आणि त्यांना हे जेतेपद पटकावण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. ब्राझीलचा स्टार नेयमार याने गेल्या सहाही सामन्यात गोल केले आहेत आणि त्याच्या खात्यात ३५ गोल जमा आहेत. त्याच्या सोबतीला लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेज आहेतच. मात्र, बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक्स यांना म्युनिक संघ संघर्ष नकरताच स्पध्रेबाहेर जाईल असे वाटत नाही. ते म्हणाले, ‘‘ऑग्सबर्ग संघाविरुद्ध म्युनिकचा खेळ मी पाहिला. ते पराभूत झाले असले तरी , केवळ दहा खेळाडूंसह त्यांनी ७० मिनिटे संघर्ष केला. महत्त्वाच्या लढतीत कसा खेळ करायचा याची जाण त्यांना आहे.’’