बडोद्याविरुद्धचा सामना अनिर्णित राखण्यात यश; स्वप्निल सिंग सामनावीर

बडोदा : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने झळकावलेले झुंजार शतक व इतर फलंदाजांकडून त्याला मिळालेली योग्य साथ यामुळे महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटात बडोदाविरुद्धचा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. बडोद्याने विजयासाठी दिलेल्या ४६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राने दुसऱ्या डावात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या. पहिल्या डावात ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या व सामन्यात एकूण सात बळी मिळवणाऱ्या बडोद्याच्या स्वप्निल सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

बुधवारच्या ३ बाद ३६७ धावांवरून पुढे खेळताना बडोद्याने विष्णू सोलंकी १७५ धावांवर बाद होताच डाव घोषित केला. पहिल्या डावात ९९ धावांची खेळी करणारा युसूफ पठाण दुसऱ्या डावात १६ धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या डावात ८२.४ षटकांत बडोद्याने ४१० धावांचा डोंगर उभारला.

प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राने दमदार सुरुवात केली. ऋतुराज व चिराग खुराना यांनी पहिल्या गडय़ासाठी ८१ धावांची भागीदारी केली. चिराग ३६ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार अंकित बावणेने बाद होण्यापूर्वी ४० धावांचे बहुमूल्य योगदान देत बडोद्याचा विजय होणार नाही, याची काळजी घेतली. ऋतुराजने १६ चौकार व एका षटकारासह नाबाद ११८ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे त्याने तब्बल २६६ मिनिटे (चार तास, १६ मिनिटे) खेळपट्टीवर ठाण मांडल्याने सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकला. बडोद्यासाठी स्वप्निलने दुसऱ्या डावातील दोनही गडी गारद केले.

संक्षिप्त धावफलक

बडोदा (पहिला डाव) : ८३.४ षटकांत सर्वबाद ३२२

महाराष्ट्र (पहिला डाव) : ८९.२ षटकांत सर्वबाद २६८

बडोदा (दुसरा डाव) : ८२.४ षटकांत ५ बाद ४१० (डाव घोषित)

महाराष्ट्र (दुसरा डाव) : ६७ षटकांत २ बाद २१७ (ऋतुराज गायकवाड नाबाद ११८, अंकित बावणे ४०; स्वप्निल सिंग २/५९).

सामनावीर : स्वप्निल सिंग (बडोदा)

विदर्भ कर्नाटक सामना अनिर्णित

नागपूर : यंदाच्या हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गतविजेत्या विदर्भाला अद्याप विजयी सूर गवसला नाही. फलंदाजीत बलस्थान असलेल्या विदर्भाचा दुसरा सामनाही अनिर्णित ठरला. पहिल्या डावात कर्नाटकाच्या देगा निश्चल आणि आर. शरथने शानदार शतक ठोकून विदर्भाच्या अडचणीत भर टाकली. मात्र, दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात विदर्भाच्या फलंदाजांना यश आले नाही आणि कर्नाटकाला १५८ धावांचे विजयी लक्ष्य दिले. मात्र, चौथ्या दिवसअखेर कर्नाटकाने ७६ धावा करत सामना अनिर्णित ठरवला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुणांची कमाई करत विदर्भाला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.
संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) १०२.२ षटकांत सर्वबाद ३०७ (वसीम जाफर ४१, गणेश सतिश ५७, श्रीकांत वाघ ५७; जगदीशा सूचिथ ४/३३, अभिमन्यू मिथून ३/५३,) वि. कर्नाटक (पहिला डाव)१३४ षटकांत सर्वबाद ३७८ (श्रेयस गोपाल ३०,आर. शरथ १०३, विनयकुमार ३९; आदित्य सरवटे ५/९१, अक्षय वखरे २/९३, आर.संजय २/२३) विदर्भ (दुसरा डाव) ८६.१ षटकांत सर्वबाद २२८ (वसीम जाफर नाबाद २१,गणेश सतिश ७९,अपूर्व वानखेडे ५१; जगदीशा सूचिथ ५/७०,एम. प्रसिद २/५८) कर्नाटक (दुसरा डाव) ३३ षटकांत ६ बाद ७६ (रविकुमार समर्थ ३०; आदित्य सरवटे ४/२४).