युएईत तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. २०२१ मध्ये एप्रिल-मे महिन्यात भारतातच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचं आयोजन करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न असल्याचं अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे. इतकच नव्हे तर पुढील हंगामासाठी दोन नवीन संघ मैदानात उतरवण्याचीही बीसीसीआयची तयारी आहे. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय होणार आहे. वार्षिक सभेत सर्व राज्य संघटानाची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन नव्या संघाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दोन डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ८९ व्या वार्षिक सभेत २३ मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. माहिम वर्मा यांची गेल्यावर्षी उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद खाली आहे. अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी कार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठीच्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालय ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच आयोजनाबद्दलचे संकेत दिले आहेत. सर्व गोष्टी जुळून आल्या तर पुढील हंगामात आणखी दोन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेतील. स्पर्धेचं आयोजन भारतात करायचं झाल्यास बीसीसीआयने यासाठी Bio Secure Bubble निर्माण करण्याची तयारीही दाखवली आहे.