क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास BCCIने परवानगी दिली आहे. विदेश दौऱ्याचे पहिले १० दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला त्या दौऱ्यावर खेळाडूसोबत राहता येणार नाही. त्यानंतर मात्र साथीदार ती क्रिकेटपटूसोबत दौऱ्यावर राहू शकते. या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहलीला दिलासा मिळाला असून येत्या काळात अनुष्कालाही त्याला विदेश दौऱ्यांवर नेता येणार आहे. काही दिवसांपूर्वी विराटने या संदर्भातील मागणी केली होती.

विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर पत्नी अनुष्का शर्मालासोबत घेऊन गेला होता. तेव्हा पत्नीला किंवा प्रेयसीला विदेश दौऱ्यांवर सोबत घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. यामुळे विराटवर भरपूर टीका करण्यात आली होती. त्यामुळे पत्नी किंवा प्रेयसीलाही सोबत घेऊन जाण्यास परवानगी असावी अशी मागणी विराटने BCCIकडे केली होती.

यावर विचार करून BCCIने परवानगी दिली असली, तरी एक अट घातली आहे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अॅशेससाठी खेळाडूंना पत्नी-प्रेयसीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. याचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे.