नुकसानभरपाईसाठी ‘बीसीसीआय’चे ‘ईसीबी’पुढे दोन पर्याय

संघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने मागील आठवड्यात इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. मँचेस्टर येथे होणारा हा कसोटी सामना रद्द करावा लागल्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यात दोन अतिरिक्त ट्वेन्टी-२० सामने अथवा एक कसोटी सामना खेळण्याचा पर्याय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘ईसीबी’ पुढे ठेवला आहे.

‘‘भारतीय संघ पुढील वर्षी जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन ऐवजी पाच ट्वेन्टी-२० सामने खेळवण्याची आमची तयारी आहे. आम्ही ‘ईसीबी’पुढे एका कसोटी सामन्याचाही पर्याय ठेवला आहे. त्यांना या दोनपैकी एक पर्याय निवडता येईल,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी सांगितले. पाचव्या कसोटीच्या फेरआयोजनाचा पर्यायही ‘ईसीबी’ पुढे कायम असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

तसेच रद्द झालेल्या कसोटीबाबत निर्णयप्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘ईसीबी’ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) धाव घेतल्याच्या वृत्ताबाबत माहिती नसल्याचे शाह म्हणाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागल्याने ‘ईसीबी’चे साधारण ४ कोटी पौंडचे नुकसान झाले आहे.

करोना परिस्थितीमुळे सर्वच गोष्टी अनिश्चित – कोहली

इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले. ‘आयपीएल’च्या उर्वरित मोसमासाठी कोहली दुबईमध्ये दाखल झाला आहे. ‘‘आम्ही अपेक्षित होते, त्याआधीच इथे (अमिरातीमध्ये) आलो आहोत. मात्र, करोना परिस्थितीमुळे सर्वच गोष्टी अनिश्चित झाल्या आहेत. कधीही काहीही होऊ शकते. ‘आयपीएल’मध्ये सुरक्षित वातावरण असेल आणि दर्जेदार सामने होतील अशी आशा आहे,’’ असे कोहली म्हणाला.