भारतीय क्रिकेट बोर्डाला क्रिकेटमधला भ्रष्टाचार संपवायचा आहे की नाही? असा प्रश्न पडावा असा आरोप बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार यांनी केला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त खेळावरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे.

अवश्य वाचा – कटकच्या मैदानात ८ विक्रमांची नोंद, धोनीकडून एबी डिव्हीलियर्सचा विक्रम मोडीत

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख असलेल्या नीरज कुमार यांनी बीसीसीआयला घरचा आहेर दिला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाला भ्रष्टाचारविरोधी लढ्यात अजिबात स्वारस्य नसल्याचा आरोपच नीरज कुमार यांनी केला आहे. युरोपमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दोन भारतीय व्यक्ती अॅशेस मालिकेतील कसोटी सामन्यांविषयीच्या अंदाजित तपशीलांची देवाणघेवाण करताना दाखवण्यात आल्या आहेत.

या प्रकरणाचा दाखला देत बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पाठवलेल्या ई-मेलला उत्तर देताना नीरज कुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलमधल्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर भारतातल्या क्रिकेटमधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे ऐरणीवर आली आणि भ्रष्टाचारमुक्त क्रिकेट करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणजे भ्रष्टाचारविरोधी पथक.

मात्र या पथकात काम करण्यासाठी कर्मचारीच नसल्याचा आरोप नीरज कुमार यांनी केला आहे. तसेच ही कर्मचाऱ्यांची कमतरता भरुन काढण्यासाठीही बीसीसीआयने पुढाकार घेतला नसल्याचं नीरज कुमार यांनी म्हणलं आहे. “आपल्या आतापर्यंतच्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा केल्याचं मला आठवत नाही. भ्रष्टाचारमुक्त खेळासाठी काय गोष्टी करणं गरजेचं आहे यावर आपली एकदाही चर्चा झाली नाही.” असा घरचा आहेरच नीरज कुमार यांनी दिला बीसीसीआयला दिला आहे.