ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सलामीवीर रोहित शर्माने आपली फिटनेस टेस्ट पास करत भारतीय संघात जागा मिळवली आहे. रविवारी रोहित शर्मा दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. परंतु ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार रोहितने आपली फिटनेस टेस्ट पास केली असली तरीही शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याचा सहभाग अजून निश्चीत मानला जाणार नाहीये. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर रोहित टीम इंडियासाठी तयार करण्यात आलेल्या Bio Secure Bubble मध्ये प्रवेश करेल, १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर टीम इंडियाचा मेडीकल स्टाफ रोहितच्या तब्येतीचा आणि फिटनेसचा आढावा घेऊन तो उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तयार आहे का याचा निर्णय घेईल.

NCA मध्ये रोहितची फिटनेस टेस्ट शुक्रवारी पार पडली. यावेळी फलंदाजी, क्षेत्ररक्षण, रनिंग बिटविन द विकेट्स अशा सर्व निकषांमध्ये रोहितने बाजी मारली. परंतू ऑस्ट्रेलियात १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावाधीत रोहितला आपली सहनशक्ती वाढवण्याची गरज असल्याचं NCA च्या मेडीकल स्टाफने सांगितलं आहे. यासाठी त्याला ट्रेनिंग शेड्यूल आखून देण्यात आलं आहे. सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्यास रोहित शर्मा अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

२०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिका खेळत असताना रोहितच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते, ज्यामुळे त्याला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं. यानंतर रोहितने प्रदीर्घ काळानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामात पदार्पण केलं. आयपीएल खेळत असतानाच त्याला पुन्हा एकदा हॅमस्ट्रींग इंज्युरी झाली…ज्यामुळे तो काही सामन्यांना मुकला. याच दुखापतीमुळे रोहितची वन-डे आणि टी-२० संघात निवड झाली नाही. त्यामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात आपला १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी कसा पूर्ण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.