जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या कारवाईत 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनीही हल्ल्यातील शहीद जवानांच्या परिवाराला बीसीसीआयने किमान 5 कोटींची मदत करायला हवी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात खन्ना यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांच्याकडे पत्र लिहून मागणी केल्याचंही कळतंय.

पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर झालेल्या हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण देश दु:खात बुडालेला आहे. या कठीण प्रसंगात बीसीसीआयने शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारी मदतनिधीमार्फत किमान 5 कोटी रुपयांची मदत केली पाहिजे.” खन्ना यांनी प्रशासकीय समितीकडे मागणी केली आहे. याचसोबत बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य क्रिकेट संघटना व आयपीएलमधील संघ मालकांनीही यामध्ये सहभाग घेण्याच आवाहन खन्ना यांनी केलं आहे.

नुकतचं इराणी चषकात विजय मिळवलेल्या विदर्भाच्या संघानेही आपल्या इनामाची रक्कम हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांनी शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.