किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे मत

‘‘इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला क्रिकेटपटूंसाठी लीग आयोजित करायला हवी. त्याचा फायदा सर्वच देशांमधील महिला खेळाडूंना मिळेल. मुळातच महिलांना फारसे सामने खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० लीग महिला क्रिकेट प्रसारासाठी फायद्याची ठरेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा,’’ असे मत किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलने व्यक्त केले.

गेलने पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी संग्रहालयाला यंदाच्या आयपीएलमध्ये शतक नोंदवलेली बॅट भेट दिली. या वेळी त्याने उपस्थित असलेल्या शालेय मुलामुलींना क्रिकेटची मौलिक शिकवणही दिली. यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीबाबत गेल म्हणाला, ‘‘पहिल्या सामन्यात शतक केल्यानंतर माझ्याकडून अपेक्षेइतकी आक्रमक खेळी झाली नाही. माझ्या कामगिरीत सुधारणा करण्यास भरपूर संधी आहे. त्यादृष्टीने मी सरावात भर देणार आहे. आयपीएल स्पर्धा ही युवा खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा फायदा भारताबरोबरच अन्य देशांच्या खेळाडूंनाही मिळतो. यंदा आमच्या देशाच्या खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. काही वेळा लागोपाठच्या सामन्यांमुळे कामगिरीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.’’

मी रोनाल्डोचा भक्त!

क्रिकेटनंतर मला फुटबॉल खूप आवडते. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मी भक्त आहे. त्याचे सामने मी अनेक वेळा पाहतो. त्याच्या संघाने यंदाचा विश्वचषक जिंकला पाहिजे अशी  इच्छा आहे,असे गेलने सांगितले.