१८ ते १९ सप्टेंबरदरम्यान दुबई आणि अबुधाबीत आयोजित करण्यात आलेल्या आशिया चषकाच्या आयोजनावर आता BCCI ने कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या स्पर्धेसाठी भारताचा समावेश अ गटात करण्यात आला असून भारतासोबत पाकिस्तानचाही याच गटात समावेश करण्यात आला आहे. तर अ गटात भारताचा दुसरा प्रतिस्पर्धी अजुन ठरायचा आहे. मात्र या स्पर्धेचं आयोजन करताना आशियाई क्रिकेट परिषदेने डोकं वापरलंय का असा उपरोधिक सवाल बीसीसीआयने विचारला आहे. १८ आणि १९ सप्टेंबर रोजी भारताला लागोपाठ वन-डे सामने खेळायचे आहेत. १८ तारखेला होणाऱ्या सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी अजुन ठरला नसला, तरीही दुसऱ्याच दिवशी भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत.

CricketNext या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आशिया चषकाच्या आयोजनावर टीका केली आहे. “आशिया चषकाचं आयोजन हे अतिशय निर्बुद्धपणे केलेलं आहे. वेळापत्रक ठरवताना आशियाई क्रिकेट परिषदेने जराही डोकं वापरलेलं दिसत नाहीये. एक सामना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत पाकिस्तानविरुद्ध कसा खेळू शकतो. प्रत्येक सामन्यामध्ये किमान एक दिवसाची विश्रांती ही असलीच पाहिजे. या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची गरज आहे. स्पर्धेच्या आयोजकांसाठी हा पैसे मिळवण्याचं एक साधन असू शकतं मात्र आमच्यासाठी हे त्रासदायक ठरु शकतं.”

अवश्य वाचा – आशिया चषकातून माघार घ्या, संतप्त विरेंद्र सेहवागचा भारतीय संघाला सल्ला

याआधी भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनेही आशिया चषकाच्या आयोजनावर टीका केली होती. सेहवागने एक पाऊल पुढे जात भारतीय संघाने आशिया चषक खेळू नये असा सल्लाही दिला होता. २०१६ साली बांगलादेशमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०१६ साली ही स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात आली होती. अंतिम फेरीत भारताने यजमान बांगलादेशवर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे बीसीसीआयच्या टीकेनंतर आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.