चार संघांच्या खेळाडू, सहायकांना करोनाची लागण झाल्याने निर्णय

नवी दिल्ली : चार संघांच्या खेळाडूंना आणि सहायकांना करोनाची बाधा झाल्याचे गेल्या दोन दिवसांत आढळून आल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही स्पर्धा त्वरित स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. आयपीएलचे सर्वच संघ जैव सुरक्षित परिघात (बायो बबल) वावरत असल्यामुळे कोणालाही करोना संसर्ग होणार नाही, असा ठाम विश्वास फ्रँचायझींच्या चालक-मालकांनी, तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने व्यक्त केला होता, तो फोल ठरला.

स्पर्धा स्थगित झाल्यामुळे बहुतेक सर्वच संघांशी संबंधित आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, सहायकांच्या मायदेश माघारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. या खेळाडूंच्या माघारीचा निर्णय लवकरच घेऊ व शक्य तो सारी मदत करू, असे आश्वासन बीसीसीआयने दिले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचे गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर तसेच चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवरील पाच मैदान कर्मचाऱ्यांना सोमवारी करोनाची लागण झाली होती. मंगळवारी त्यात सनरायजर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांची भर पडली. त्यामुळे ‘आयपीएल’ प्रशासकीय मंडळ आणि ‘बीसीसीआय’ यांनी तात्काळ पावले उचलत उर्वरित आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

ट्वेन्टी-२० विश्वचषक अमिरातीत?

‘आयपीएल’चा १४वा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आल्याने आता ऑक्टोबरमध्ये भारतातच होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतात त्यादरम्यानच्या काळात करोनाचा प्रभाव कायम राहिल्यास, संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा खेळवण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जून महिन्यात होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे देश भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर आक्षेप घेत आहेत, अशीही चर्चा आहे.

परदेशी खेळाडूंच्या परतीचा प्रश्न कायम

‘आयपीएल’चे १४वे पर्व स्थगित करावे लागल्यानंतर परदेशी क्रिकेटपटूंच्या मायदेशी परतण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. ऑस्ट्रेलियात १५ मेपर्यंत टाळेबंदी असून तोपर्यंत त्यांच्या खेळाडूंना भारतातच मुक्काम करावा लागणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे १४, न्यूझीलंडचे १०, इंग्लंडचे ११, दक्षिण आफ्रिकेचे ११, वेस्ट इंडिजचे नऊ तसेच अफगाणिस्तानचे तीन आणि बांगलादेशचे दोन क्रिकेटपटू आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत.