इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचे वडील जेड स्टोक्स यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून जेड ब्रेन कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. मुळचे न्यूझीलंडचे असलेले जेड स्टोक्स हे उत्कृष्ट रग्बीपटू आणि प्रशिक्षक होते. काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत राहता यावं यासाठी बेन स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध दौऱ्यातून माघार घेत न्यूझीलंडला आपल्या परिवारासोबत राहणं पसंत केलं होतं.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून सुरुवातीच्या काही सामन्यांमध्येही बेन स्टोक्स सहभागी झाला नव्हता. परंतू नंतर वडिलांनी परवानगी दिल्यानंतर तो आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळला. सध्या बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघासोबत दक्षिण आफ्रिकेत असून तो लवकरच आपल्या परिवारासोबत राहण्यासाठी न्यूझीलंडला रवाना होणार असल्याचं कळतंय.

बेन स्टोक्समध्ये क्रिकेटची आवड निर्माण करण्यात जेड स्टोक्स यांचा महत्वाचा वाटा मानला जातो. काही महिन्यांपूर्वीच त्यांना दुर्धर अशा ब्रेन कॅन्सरचं निदान झालं होतं, ज्यानंतर त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेरीस वयाच्या ६५ व्या वर्षी जेड स्टोक्स यांनी अखेरचा श्वास घेतला.