करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. भारतातही बीसीसीआयने सर्व स्थानिक स्पर्धांसह आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित ठेवला आहे. मात्र क्रिकेट स्पर्धा बंद असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएल स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची तपासणी करत आहे. याचदरम्यान बंगाल क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्यालाच करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय.
बंगाल क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य सागरमॉय सेनशर्मा यांना करोनाची लागण झाल्याची माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी दिली. सेनशर्मा यांच्या पत्नीचा अहवाल सर्वात प्रथम पॉजिटीव्ह आला होता. त्या उपचार घेऊन बऱ्या होऊन घरी परतल्यानंतर आणि सागरमॉय यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. मात्र सेनशर्मा यांच्या घरातील इतर सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले असल्याची माहिती अविषेक दालमिया यांनी दिली.
५४ वर्षीय सेनशर्मा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांचा सर्व खर्च बंगाल क्रिकेट असोसिएशन करणार आहे. १९८९-९० च्या रणजी विजेत्या बंगाल संघाचे सेनशर्मा सदस्य होते. पश्चिम बंगालमध्येही सातत्याने करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात २०० हून अधिक लोकांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 3:13 pm