भारतीय रोइंगपटूंची तयारी जोमात

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला ज्या क्रीडाप्रकारांमध्ये पदकाची आशा दिसत आहे, त्यात रोइंगचादेखील समावेश आहे. भारताचे अव्वल रोइंगपटू दत्तू भोकनळ आणि स्वर्णसिंग यांनी तर भारतासाठी सुवर्णपदकाचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी काही विशेष प्रकारची तयारी आम्ही करीत असल्याने आम्ही सुवर्णपदक पटकावू असा विश्वास वाटत असल्याचे भोकनळ यांनी सांगितले. सर्व रोइंगपटू सध्या पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजनजीकच्या लष्करी रोइंग केंद्रावर सराव करीत आहेत. २०१५ साली झालेल्या रोइंगच्या आशियाई स्पर्धेत भोकनळने रौप्यपदक पटकावले होते. त्याशिवाय रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याने तेरावे स्थान गाठले होते. २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून गत चार वर्षांत त्याच्या वेळेत खूप सुधारणा झाली आहे. भारतासह जपान, चीन आणि इराणच्या संघांमध्ये चुरशीची लढत होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भारतीय संघातील स्वर्णसिंगने गत आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. मात्र त्यानंतर पाठदुखीचा त्रास आणि टायफॉईडच्या आजारातून तीन महिन्यांपूर्वीच उठल्यापासून स्वर्णसिंगने आशियाईच्या दृष्टीने तयारीवर भर दिला आहे. तसेच गतवेळेपेक्षा या वर्षीच्या पदकाचा रंग अधिक चांगला करण्याचा निर्धार मनात असल्याचे स्वर्णसिंग याने सांगितले. भारताच्या रोइंग पथकामध्ये २७ पुरुष, ७ महिला, पाच प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि एका शारीरिक  प्रशिक्षकाचा समावेश आहे.