टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला करोनाची सौम्य लक्षणे जाणवली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नी नुपूरसह क्वारंटाइन झाला आहे. भुवनेश्वरच्या आईलाही करोनाची लागण झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीएमओ डॉक्टर अखिलेश मोहन यांनी याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या वडिलांचे निधन झाले होते.

भुवनेश्वर आणि त्याची पत्नी नुपूर या दोघांनीही करोना चाचणीसाठी आपले नमुने दिले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. हे दोघेही मेरठमधील त्यांच्या घरी क्वारंटाइन आहेत.

हेही वाचा – अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न

भुवनेश्वरची प्रकृती बिघडल्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. भुवनेश्वर पुढील महिन्यात श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहेत. अद्याप या संघाची घोषणा झालेली नसली, तरी भुवनेश्वर त्या संघाचा महत्त्वाचा भाग असेल. भुवनेश्वर तंदुरुस्त नसेल, तर टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीत अनुभवाचा अभाव असेल.

भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तो बराच काळ दुखापतीशी झुंज देत होता. भुवनेश्वर कुमारला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, असे वृत्त आले होते, पण त्याने ही बातमी चुकीची असल्याची सांगितली होती.

हेही वाचा – VIDEO : “आपला भाऊ तर पुरुषांमधला ढिंच्याक पूजा निघाला”

भुवनेश्वरच्या वडिलांना होता यकृताचा त्रास

भुवनेश्वरने नुकतेच आपल्या वडिलांना गमावले आहे. त्याचे वडील किरणपाल दीर्घ काळ यकृताच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. उपचारानंतरही ते बरे होऊ शकले नाहीत. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.