मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक महान फलंदाज होता. त्याने २४ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मो़डले. भारतातच नव्हे, तर भारताबाहेरदेखील सचिनने गोलंदाजांची धुलाई केली. सचिनला बाद करणे हे त्याच्या काळातील प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असायचे. आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर देशांतर्गत स्पर्धेतही सचिनला बाद करणाऱ्या गोलंदाजाला एक वेगळाच मान मिळत असे. २००९ च्या एका देशांतर्गत स्पर्धेतील सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने सचिनला चक्क शून्यावर बाद केलं. त्यावेळी नक्की काय भावना होत्या ते त्याने ११ वर्षानंतर एका मुलाखतीत सांगितलं.

“सचिनला बाद करणं हा क्षण माझ्यासाठी खूपच आनंददायी होता. ती भावना शब्दात वर्णन करणं खूपच कठीण आहे. काही क्षण हे आपण फक्त जगू शकतो पण इतरांना त्याबद्दल फारसं काही सांगू शकत नाही. तशाच प्रकारचा तो क्षण होता. मी कटर चेंडू टाकला होता. वेगवान गोलंदाजी सहसा त्या चेंडूचा वापर करतात. त्यामुळे सचिनला बाद करण्याचं श्रेय आमचा कर्णधार मोहम्मद कैफला जातं. क्रिकेटच्या पुस्तकात सापडणार नाही अशा ठिकाणी त्याने एक फिल्डर उभा केला आणि मला कटर चेंडू टाकायला सांगितला. मी टाकलेला चेंडू सचिनने मारला आणि चेंडू थेट फिल्डरच्या हातात गेला. त्यामुळे मला सचिनला बाद करण्याचं भाग्य मिळालं”, असे भुवनेश्वर कुमारने सांगितले. सचिन त्या सामन्यात डीप शॉर्ट लेगच्या फिल्डरकरवी झेलबाद झाला होता.

“सामन्याच्या आधी लिफ्टमध्ये सचिन आणि मी एकत्र होतो. तो मोबाईल पाहण्यात व्यस्त होता आणि मी त्याचे बारकाईने निरीक्षण करत होतो. त्यानंतर त्याला गोलंदाजी करायची वेळ आली तेव्हा मी बावरून गेलो होतो. १९ वर्षाचा मुलगा जगातील सर्वोत्तम खेळाडूला गोलंदाजी करणार आहे हेच माझ्या डोक्यात होतं. पण त्यानंतर त्याला बाद केल्यावर माझा विश्वास वाढला आणि तो क्षण माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरला”, असेही भुवनेश्वर म्हणाला.

काही दिवसांपूर्वी, प्रग्यान ओझानेही सचिनला IPL मध्ये बाद केल्यावर संघमालकाकडून गिफ्ट मिळाल्याचा अनुभव सांगितला होता.