मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) निकालनिश्चिती प्रकरणी २०१३मध्ये आजीवन बंदी घालण्यात आलेला मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणने आता ही बंदी उठवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे विचारणा केली आहे. त्याला ‘बीसीसीआय’कडून उत्तराची प्रतीक्षा आहे.
अंकित म्हणाला की, ‘‘बीसीसीआयचे लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी माझ्यावरील आजीवन बंदीची शिक्षा सात वर्षांवर आणली होती. हा कालावधी २० सप्टेंबर २०२०मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे मी सतत ‘बीसीसीआय’कडे याबाबत विचारणा करत आहे. पण त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर मिळत नसल्याने मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) विचारणा केली आहे. ‘बीसीसीआय’कडून सात वर्षांच्या बंदीचे अधिकृत पत्र मला हवे आहे. जेणेकरून मला या मोसमात ‘एमसीए’कडून खेळता येईल. क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात करण्यासाठी मला या पत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘एमसीए’ने या प्रकरणी हस्तक्षेप करून ‘बीसीसीआय’ला विचारणा करावी, असे या पत्रात मी म्हटले आहे.’’