आपल्या चिवट फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा भारताचा चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लॉयनचा शिकार ठरत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात नॅथन लॉयन यानं पुजाराला ४३ धावांवर बाद केलं. लॉयनची पुजाराला बाद करण्याची ही दहावी वेळ होती. आतापर्यंत पुजाराला नॅथन लॉयन यानं सर्वाधिक वेळा बाद केलं आहे.

फिरकीपटू नॅथन लॉयन यानं आतापर्यंत पुजाराला कसोटी सामन्यात दहा वेळा बाद केलं आहे. त्याच्यानंतर अँडरसन यानं सातवेळा पुजाराला बाद केलं आहे. यांच्याशिवाय ब्रॉड, हेजलवूड, स्टोक्स आणि बोल्ट यांनी प्रत्येकी चार-चार वेळा पुजाराला बाद केलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाल्यामुळे पहिल्याच षटकात पुजाराला मैदानावर यावं लागलं. पुजारानं त्यानंतर सयंमी आणि चिवट फलंदाजी केली. पण जम बसलेला मयांकही तंबूत परतला. दोन विकेट झटपट बाद झाल्यानंतर पुजारा आणि कोहलीनं भारताचा डाव सावरला. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चहापानाच्या सत्रापर्यंत ३ बाद १०७ अशी मजल मारली आहे. पुजारानं १६० चेंडूचा सामना करत सयंमी फलंदाजीचं प्रदर्शन केलं.