जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआय सह बहुतांश क्रिकेट बोर्डांनाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली. काही देशातील खेळाडूंनी यानुसार सरावाला सुरुवातही केली आहे. भारताकडून काही दिवसांपूर्वी शार्दुल ठाकूरने पालघरमध्ये सरावाला सुरुवात केली होती. यानंतर फिरकीपटू कुलदीप यादवनेही सरावाला सुरुवात केली आहे. कुलदीप उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात राहतो.

“मी आमच्या भागात लाल बंगला परिसरात रोव्हर्स मैदान आहे तिकडे सरावाला सुरुवात केली आहे. मी दिवसातून दोन सत्रात सराव करतोय. सकाळी साडेसात ते ९ वाजेपर्यंत व्यायाम करण्याकडे भर देतो. यानंतर मी घरी जाऊन परत संध्याकाळी ४ वाजता मैदानावर येतो. यावेळी मी ८ वाजेपर्यंत गोलंदाजीचा सराव करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे मी लाख आणि थुंकीचा वापर न करता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. गेला आठवडाभर मी अशा पद्धतीने सराव करतोय. साहजिकच मी सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे पाळत आहे. पुढील २-४ आठवड्यांमध्ये असाच सराव केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार होईन.” कुलदीप पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुलदीपने आतापर्यंत ६ कसोटी, ६० वन-डे आणि २१ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. लहानपणापासून प्रत्येक गोलंदाज हा लाळ किंवा थुंकीचा वापर करुन गोलंदाजीचा सराव करत असतो. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता आयसीसीने लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नव्या नियमांशी जुळवून घ्यायला थोडा वेळ जाईल असंही कुलदीपने यावेळी स्पष्ट केलं.