विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील नियोजित सामन्यांबाबत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे मत

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. या परिस्थितीत आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतींवर बहिष्कार घालण्याची मागणी उचित आहे, असे मत बुधवारी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले.

जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान  ठार झाले. या पार्श्वभूमीवर ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढती भारताने खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात १६ जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे साखळीतील सामना होणार आहे. त्यानंतर बाद फेरीमध्ये त्यांच्यात आणखी एक सामना होण्याची शक्यता आहे.

‘‘क्रिकेटसंदर्भात मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. मात्र जे ही मागणी करीत आहेत, त्यामागे ठोस भूमिका आहे. अनेक चित्रपट आणि मैफिली रद्द करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांनी हे प्रकरण हाताळावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा,’’ असे प्रसाद यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

‘‘विश्वचषकासारख्या स्पर्धेसंदर्भात सुरक्षेचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. मात्र आता नाही म्हणण्याची वेळ आली आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांविषयी इम्रान खान यांच्याकडे शब्दच नाहीत,’’ असे प्रसाद यांनी सांगितले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांसदर्भातील सरकारच्या नियमांचे आम्ही पालन करू, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत विश्वचषकाच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे. माजी ऑफ-स्पिनर हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट लढती रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर रवीशंकर यांनी हे मतप्रदर्शन केले.