आगामी भारत विरुद्ध विंडिज वन-डे मालिकेतला चौथा सामना, मुंबईच्या वानखेडे मैदानावरुन ब्रेबॉन स्टेडीयमला हलवण्यात आला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. २००९ साली भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना हा या मैदानावरचा शेवटचा कसोटी सामना ठरला होता, यानंतर तब्बल ९ वर्षांनी हे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्याचं यजमानपद भूषवणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) आणि बीसीसीआय यांच्यामध्ये मोफत तिकीटं व अन्य तांत्रिक मुद्द्यांवरुन चर्चा सुरु होती. क्रिकेट प्रशासकीय समिती यजमान क्रिकेट संघटनेला ६०० तिकीटांपेक्षा जास्त मोफत तिकीट देण्यासाठी तयार नव्हती. त्यातच एमसीएवर सध्या प्रशासकांची नियुक्ती झाली असल्यामुळे नेहमीच्या कामकाजातही अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या कारणांमुळे क्रिकेट प्रशासकीय समितीने ब्रेबॉन स्टेडीयमला मुंबईतील वन-डे सामन्याच्या आयोजनाचे हक्क दिले आहेत. २९ ऑक्टोबरोजी मुंबईत वन-डे सामना रंगणार होता, मात्र आता हा सामना ब्रेबॉनला हलवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांमध्ये मोफत पासांच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहेत. २१ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध विंडीज वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.­­­