भारतीय फुटबॉलला नवी झळाळी देणाऱ्या इंडियन सुपर लीगमध्ये काही संघांनी अव्वल फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. पण संघाला चेहरा मिळवून देण्यासाठी गोवा संघाने थेट ब्राझीलचे महान फुटबॉलपटू आर्थर अँटय़ूनेस कोइम्ब्रा अर्थात झिको यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. झिको हे आयएसएलमध्ये सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला नवे रूपडे लाभले आहे.
चेल्सीचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांचे माजी साहाय्यक स्टीव्ह क्लार्क यांच्याशी गेले काही आठवडे सुरू असलेल्या चर्चेनंतर तसेच करारासंदर्भातील अडथळे दूर केल्यानंतर गोवा संघाला प्रशिक्षक म्हणून झिको यांच्यासारखा महान खेळाडू लाभला. फिफा विश्वचषकात तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे आणि जपान संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारे झिको यांनी अखेर मंगळवारी गोवा संघाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘‘झिको हे आयएलएल स्पर्धेदरम्यान गोवा संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार असल्यामुळे हा फक्त गोवा संघासाठीच नव्हे तर भारतीय फुटबॉलसाठी अभिमानास्पद क्षण असेल,’’ असे सूत्रांनी सांगितले.
या आठवडय़ात गोवा संघाचे पदाधिकारी ब्राझीलमध्ये जाऊन झिको यांची भेट घेणार आहेत. झिको हे १० किंवा १२ सप्टेंबर रोजी भारतात दाखल होणार असून तीन दिवसांनंतर गोवा संघाच्या सरावाला वास्को येथील टिळक मैदानात सुरुवात होणार आहे. ‘‘झिको यांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. जपानचे प्रशिक्षकपद भूषवताना झिको यांनी जपान फुटबॉलला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली,’’ असेही त्यांनी सांगितले. तीन वेळा प्रतिनिधित्व करूनही ब्राझीलला फिफा विश्वचषक जिंकून देण्यात अपयशी ठरलेल्या झिको यांची प्रशिक्षकपदाची कारकीर्द मात्र चांगलीच गाजली.
झिको यांच्या मार्गदर्शनाखाली जपानने २००६ मध्ये फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले होते, पण त्यांना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. झिको यांनी जपान संघाबरोबच फेनेरबाहके (तुर्की), काशिमा अँटलर्स, बुनीओडकोर (उझबेकिस्तान), ऑलिम्पियाकोस (ग्रीस), सीएसकेए मॉस्को (रशिया) आणि अल-घराफा (कतार) या संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.