साव पावलो

तीन दिवसांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करावे की नाही, हे ठरवण्यासाठी ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपत्कालीन सत्र बोलावले आहे. कोलंबिया आणि अर्जेटिना या सहआयोजकांनी कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनास नकार दिल्यामुळे ब्राझिलने यजमानपदाचा प्रस्ताव स्वीकारला. पण देशातील करोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे चाहते आणि फुटबॉलपटूंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

मुख्य न्यायाधीश लुइझ फक्स यांनी मंगळवारी विशेष सत्र बोलावले होते. त्या वेळी त्यांच्यासह अन्य १० न्यायाधीशांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत नोंदवले होते. न्यायाधीश कार्मेन ल्युसिया म्हणाले की, ‘‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने निर्णय घेण्यासाठी आपत्कालीन सत्र बोलवावे लागले आहे.’’

ब्राझिलमधील समाजवादी पक्षाने तसेच धातू कामगारांच्या व्यापारी संघाने ही स्पर्धा आयोजित न करण्याची विनंती केली आहे.

ब्राझिलचा संघ खेळण्यासाठी सहमत

अखेरच्या क्षणी मायदेशात कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ब्राझिल संघानेही या स्पर्धेत खेळण्यास सहमती दर्शवली आहे. आयोजनाच्या निर्णयाविरोधात ब्राझिलच्या खेळाडूंनी असमाधान व्यक्त केले होते. ‘‘कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनाबाबत राजकीय चर्वितचर्वण घडवून आणण्याची आमची इच्छा नाही. करोनाची परिस्थिती पाहता, ही चुकीची प्रक्रिया आहे, असे आम्हाला वाटते,’’ असे ब्राझिलच्या खेळाडूंनी म्हटले आहे.

फिफा विश्वचषक पात्रता लढत : ब्राझिलचा विजय; अर्जेटिनाची बरोबरी

साव पावलो : ब्राझिलने फिफा विश्वचषक स्पर्धेतील पात्रता लढतींमध्ये पॅराग्वेचा २-० असा पराभव केला. सलग सहावा विजय मिळवत ब्राझिलने दक्षिण अमेरिका गटात १८ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. नेयमार आणि लुकास पकेटा यांच्या गोलमुळे ब्राझिलच्या विजयात योगदान दिले. पात्रता लढतींमध्ये ब्राझिलने पॅराग्वेवर ३५ वर्षांनंतर पहिला विजय मिळवला. दरम्यान, अर्जेटिनाला कोलंबियाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.