देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. दर दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या काळात देशातील सर्व क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धाही रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. १५ एप्रिलनंतरही आयपीएल होणार की नाही याची शाश्वती देता येत नाहीये. दरम्यान या काळात सर्व भारतीय खेळाडू आपल्या घरात राहुन परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने संघातल्या गोलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे.

नेहराच्या मते सध्याचा काळ हा भारतीय गोलंदाजांसाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे. आपला फिटनेस कायम राखायचा आणि सराव सुरु ठेवायचा हे आव्हान त्यांच्यासमोर असेल. “भारतीय गोलंदाजांनी या काळात आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवायला हवं. ज्यावेळी क्रिकेट पुन्हा सुरु होईल तेव्हा कोणीही वाढलेली ढेरी घेऊन मैदानात उतरु नका. सध्या सुट्टी मिळाली आहे याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला जी गोष्ट आवडते ती खात सुटायचं. आशिष नेहरा, झहीर खान यासारख्या माणसांचं पोट सुटलं तर चालणार आहे. पण सध्या जे खेळाडू खेळत आहेत त्यांना असं करुन चालणार नाही. सुट्टी बिर्याणी खाण्यासाठी मिळालेली नाहीये हे सर्वांनी लक्षात ठेवावं.” आशिष नेहरा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

या काळात भारतीय खेळाडूंनी सतत व्यायाम करत राहणं गरजेचं असल्याचंही नेहराने सांगितलं. करोनाविरुद्ध लढ्यात अनेक भारतीय क्रिकेटपटू आपली सामाजिक जबाबदारी ओळखत सरकारची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.

अवश्य वाचा – कौतुकास्पद ! गरजू व्यक्तींसाठी पठाण बंधूंनी दान केले १० हजार किलो तांदूळ, ७०० किलो बटाटे