डॉ. प्रकाश परांजपे

‘‘आबा, तुम्ही सांगितलेली स्टेमन बोली खरं म्हणजे जॅक मार्क्‍स आणि जॉर्ज रापी या खेळाडूंनी शोधली होती, पण ती स्टेमनच्या नावाने प्रसिद्ध झाली. कालच मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या १९८३ मधल्या लेखात वाचलंय तसं,’’ छोटू आबांना म्हणाला. दोन दिवसांपूर्वी जाधव आलेले असताना चित्रातला डाव आला होता. १ चौकट (१५-१७) -१ इस्पिक (६-८)अशा बोली देऊन चित्रगुणांची खातरजमा झाल्यानंतर आबांनी १ बिनहुकमी बोली दिली. त्यावर जाधव २ किलवर बोलले. प्रेक्षक छोटूचा प्रश्नार्थक चेहरा बघून आबा म्हणाले, ‘‘स्टेमन बोली.’’

साधारणपणे २५ चित्रगुण जोडीकडे मिळून असले तर शतकी ठेका बनू शकतो. पण चित्रातल्या डावात आबांकडे १५ चित्रगुण आहेत का १७, आणि जाधवकडे ६ की ८, ते कसं शोधून काढायचं? बोली करण्याच्या नादात चंद्रावर न चढता आपल्या जोडीची ताकद किती आणि पंथमेळ कुठे आहे हे तपासण्याकरता ‘स्टेमन बोली’ सारख्या सूत्रात्मक बोली उपयोगी पडतात. नवशिक्या खेळाडूंपासून जागतिक विजेत्या असामींपर्यंत सगळ्या जोडय़ा ही सूत्रबोली वापरतात. या सूत्रानुसार २ किलवर ही बोली पंथदर्शक बोली नाही, तर ती एक विचारणा बोली आहे. आधी १ बिनहुकमी बोली देणाऱ्या खेळाडूने आपल्याकडे पाच पानी पंथ नाही, हे दाखवलेलं असल्यामुळे ही विचारणा बोली चार पानी ज्येष्ठ पंथाबद्दल विचारणा करते, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलींची पातळी खाली ठेवून माहितीची देवाणघेवाण सुकर करते. २ किलवर बोलीवर चार पानी ज्येष्ठ पंथ असला तर भिडू २ बदाम किंवा २ इस्पिक बोलून तो पंथ दाखवतो, चार पानी ज्येष्ठ पंथ नसला तर २ चौकट बोलतो.

त्यानुसार आबांनी २ बदाम बोलून आपला ४ पानी पंथ दाखवला. जाधवकडेसुद्धा चार पानी बदाम पंथ असल्यामुळे आता हुकमात खेळायचं हे ठरलं होतं आणि पंथाचा निवाडा झाला होता पण शतकी ठेका अंगावर घ्यावा की नाही हे अजून ठरायचं होतं. जाधवकडे बदाम राजा आणि किलवर राजा-राणी असे ३+३+२=८ चित्रगुण असल्यामुळे त्याच्या डावाची ताकद १ इस्पिक या बोलीने दाखविलेल्या ६-८ या आवाक्याच्या वरच्या अंगाची होती, पण आबांकडे १५ आहेत की १७ हे अजून त्याला माहीत नव्हतं, त्यामुळे शतकी ठेक्याचा ठराव बाकी होता.

३ बदामचा शतकी ठेका सुचविणारी सूचक बोली देऊन जाधवने तो प्रश्न सोडवला. ‘‘त्या बोलीचा अर्थ असा होता. आबा, माझ्याकडेही ४ बदाम आहेत. जर तुमच्याकडे १७ चित्रगुण किंवा जोरकस डाव असला तर आपण शतकी ठेका निभावू शकतो. तसं असेल तर तुम्ही ४ बदाम बोली चढवा, आणि जर तुमचा डाव १५—१७ आवाक्याच्या खालच्या अंगाला असेल तर तुम्ही पास म्हणा म्हणजे झेपत नसताना आपण शतकी ठेका अंगावर घेणं टाळू शकतो!’’

आबांकडे फक्त १५ चित्रगुणच होते. आबांनी पास म्हटलं. ३ बदामचा ठेका ठरला. मेननने इस्पिक राणीची उतारी केली. या डावात आबांचे ९ दस्त होतील का? तुमचा काय अंदाज आहे?

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)