डॉ. प्रकाश परांजपे
‘‘छोटूने माझा हुकूम चोरला,’’ असं म्हणत पिंकी लिलाव संपलेला नसतानाच डाव टाकून तरातरा बाहेर निघून गेली. छोटूही तिच्या मागोमाग गायब झाला. दिवाळी-दुर्गापूजेच्या वेळी जमवलेले फटाके ख्रिसमसच्या मध्यरात्री फोडायचे हे कधीपासूनच ठरलं होतं. नरेशभाईंनीही डिसेंबरमध्ये फटाक्यांमुळे प्रदूषण होत नाही असं जाहीर केलं होतं. ‘आलिया भोगासी असावे सादर’ या न्यायानं आबांनी सक्तीच्या झोपमोडीऐवजी ब्रिजचा डाव जमवावा, असा विचार केला होता. चौकडी जमेपर्यंत मुलं ‘राखीव’ खेळाडूंची भूमिका निभावत होती.
ख्रिसने डाव वाटून १ बदाम बोली दिली. भातखंडे पास म्हणाला. भास्कर येईपर्यंत छोटू ख्रिसचा भिडू म्हणून बसला होता. त्याने सवयीने ०-५ चित्रगुण दाखविणारी १ इस्पिक बोली दिली. ख्रिस सर्वसामान्य अमेरिकन पद्धतीने खेळतो, केडी जोशी पद्धतीने नाही, हे त्याला पहिल्यांदा लक्षात नाही आलं. ख्रिसच्या पद्धतीत अशी १ इस्पिक बोली ४ पानी इस्पिक आणि ५ किंवा अधिक चित्रगुण दाखविते. बोली दिल्यादिल्या त्याला आपली चूक कळली आणि त्याने जीभ चावली, पण ख्रिसच्या नियमात बसणार नाही म्हणून तो आणखीन काही बोलला नाही. पिंकीच्या ते लक्षात आलं. तिने आपल्या पानांकडे बघितलं आणि तिला काय बोली द्यावी ते कळेना. फटाके खुणावत होतेच समोर. तिने ती संधी सोडून सरळ डाव सोडून दिला आणि ती पास म्हणून बाहेर पळाली. ख्रिसने २ बदामची बोली दिली, कारण त्याच्याकडे बदाम पंथाची ६ पाने होती.
थोडय़ाच वेळात आबा आणि भास्कर आले आणि त्यांनी आपापल्या जागा घेतल्या. भातखंडे आणि भास्करनं पास म्हटल्यानंतर आबांनी २ इस्पिक बोली दिली, भातखंडेनं ३ इस्पिक सूचक बोली देऊन शतकी ठेका होऊ शकेल असं ध्वनित केलं आणि आबांनी ४ इस्पिक बोली देऊन शतकी ठेका पक्का केला.
ख्रिसनं बदाम राजाची भवानीची उतारी केली. आबांनी बदाम एक्का जिंकून छोटं इस्पिकचं पान लावलं. ख्रिसच्या राजाला बगलेत घेऊन त्यांनी इस्पिक एक्का-गुलामचे दोन दस्त करून घेतले आणि त्यायोगे गावातले सगळे हुकूम काढून टाकले. त्यानंतर बघ्याच्या हातातून बदाम गुलाम खेळून ते ख्रिसच्या गळ्यात पडले. चौकट एक्का किंवा राणी तरी भिडूकडे असेल या आशेने तो चौकट नश्शी खेळला. आबांनी चौकट राणी जिंकली आणि किलवर एक्का आणि छोटं पान खेळून ख्रिसला किलवर राजाचा दस्त दिला. बदाम राणी आणि किलवर राजा असे दोनच दस्त ख्रिसला मिळाले. ११ दस्त बनवून आबांनी ४ इस्पिकच्या ठेक्याचा गुणफलक ५०० बक्षिसगुण + १५० दस्तगुण = ६५० असा उ-द जोडीच्या नावावर लिहिला.
निष्णात खेळाडू अशी फसवी बोली ‘मतिभ्रंश बोली’ म्हणून वापरतात. प्रतिपक्ष बुचकळ्यात पडून चुकीच्या ठेक्यापर्यंत पोचला तर त्यातून आपल्याला लाभ व्हावा या उद्देशाने. अर्थातच यामुळे भिडूची दिशाभूल होऊन आपल्याच पक्षाला फटका बसण्याचीही शक्यता असतेच. छोटूच्या गफलतीमुळे या डावात उ-द जोडीला या फसव्या बोलीचा सामना करावा लागला आणि आबांनी ते आव्हान सराईतपणे पेललं.
panja@demicoma.com
(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 12:52 am