मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात पुडिचेरी संघावर आठ गडी राखून दिमाखदार विजयाची नोंद केली. महाराष्ट्राचा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला.

पुडिचेरी संघाने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांना २० षटकांत ६ बाद १०१ धावाच करता आल्या. २ बाद १८ अशा केविलवाण्या स्थितीनंतर पारस डोग्रा आणि थलायव्हान सर्गुनाम (२९) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ५७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पारसने ३३ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. पंकज सिंगने यश नाहर (०) आणि विजय झोल (३) यांना बाद करून महाराष्ट्राची २ बाद ६ अशी अवस्था केली. परंतु ऋतुजराने कर्णधार नौशादच्या (नाबाद ४४) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी नाबाद ९९ धावांची भागीदारी करून महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने ४४ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

पुडिचेरी : २० षटकांत ६ बाद १०१ (पारस डोग्रा ३२; दिव्यांग हिंगणेकर ४/१९) पराभूत वि. महाराष्ट्र : १५.४ षटकांत २ बाद १०५ (ऋतुराज गायकवाड नाबाद ५५, नौशाद शेख नाबाद ४४; पंकज सिंग २/१८)