अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन या अनुभवी जोडीने पुरुष दुहेरीच्या सलग चौथ्या विक्रमी ग्रँडस्लॅम विजयाची नोंद केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या कमाईनंतर या जोडीने अमेरिकन खुली स्पर्धा, यंदा झालेली ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा, फ्रेंच खुली स्पर्धा आणि आता विम्बल्डनचे जेतेपद नावावर केले आहे. इव्हान डोडिग आणि मार्केलो मेलो जोडीवर ३-६, ६-३, ६-४, ६-४ अशी मात करत ब्रायन जोडीने ऐतिहासिक जेतेपदावर कब्जा केला. एकाच वेळी चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक नावावर असणारी ही एकमेव जोडी ठरली आहे. डोडिग-मेलो जोडीने पहिला सेट जिंकत शानदार सुरुवात केली, मात्र त्यानंतर ब्रायन बंधूंनी आपल्या लौकिलाला साजेसा खेळ करत पुढच्या तिन्ही सेटसह सामना जिंकला.
हेह-शुइई विजयी
लंडन : तैवानच्या सु-वेई हेह आणि चीनच्या पेंग शुअई जोडीने विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशेलह बार्टी आणि केसे डेलाअ‍ॅक्युवा जोडीला ७-६ (७-१), ६-१ असे नमवले. या दोघींनी आतार्पयच पाच जेतेपदांवर नाव कोरले आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी हेह तैवानची पहिली खेळाडू ठरली.