BWF World Tour Finals : गुआंगझू येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या समीर वर्माचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या शी युकी याने त्याला २१-१२, २०-२२, १७-२१ असे पराभूत केले. समीरने पहिला गेम मोठ्या फरकाने गमावला. पण लगेचच पुनरागमन करत त्याने दुसरा गेम २०-२२ अशा छोट्या फरकाने जिंकला आणि आपले सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले. त्यामुळे तिसऱ्या गेमकडे साऱ्यांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे तिसरा गेमही अटीतटीचा झाला. पण या गेममध्ये समीरचा अनुभव तोकडा पडला आणि त्याला स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला.

या स्पर्धेत सिंधू आणि समीर हे दोन भारतीय खेळाडू उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्यापैकी समीरचे स्पर्धेतील आव्हान संपल्यामुळे आता भारताची मदार केवळ सिंधूवर आहे. तिने आज सकाळी उपांत्य फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला २१-१६, २५-२३ असे पराभूत केले. पहिला गेम सिंधूने सहज जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये इंटानॉन हिने कडवी झुंज दिली. पण अखेर २५-२३ अशा गुणसंख्येने सिंधूने विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत सिंधूची लढत नोझुमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे.