मुंबईतील कार्यक्रमात कुस्ती महासंघाची कबुली

भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमार आणि साक्षी मलिक या दोघा कुस्तीपटूंच्या श्रेणीत सुधारणा करून त्यांना ब-श्रेणीतून अ-श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. नजरचुकीने त्यांचा ब-श्रेणीत समावेश करण्यात आला होता, असे स्पष्टीकरण संघटनेकडून देण्यात आले.

भारतीय कुस्ती महासंघाने जेव्हा खेळाडूंच्या श्रेणी जाहीर केल्या, तेव्हा साक्षी मलिक आणि सुशील कुमार या दोघांना ब-श्रेणीत ठेवण्यात आले होते. मात्र, या दोघांच्या श्रेणीत वाढ करण्यात आल्याचे टाटा मोटर्स श्रेष्ठ कुस्तीपटू विकास कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी जाहीर केले. खेळाडूंना अ, ब, क, ड, ई, फ अशा श्रेणींमध्ये ठेवून त्यांना साहाय्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुशील कुमारने ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत २००८ मध्ये कांस्य, तर २०१२ मध्ये रौप्यपदक मिळवून दिले, तर साक्षी मलिकने २०१६ मध्ये ऑलिम्पिक पदकाची किमया साधली होती. त्यामुळे अशा खेळाडूंना ब-गटात ठेवणे योग्य नाही, याची जाणीव झाल्यामुळेच आम्ही त्यांना अ-गटामध्ये स्थान दिले असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले.

‘‘आमच्याकडून झालेली चूक सुधारत आम्ही त्यांना अ-गटात स्थान दिले आहे. या चुकीबाबत खेळाडू किंवा माध्यमांनीदेखील तक्रार केली नव्हती; पण आमची चूक नजरेस आल्यानंतर त्यात सुधारणा करणे आवश्यक वाटले,’’ असे सिंह यांनी नमूद केले.

आता अ-श्रेणीत बजरंग पुनिया, विनेश फोगट, पूजा धांडा, सुशील कुमार आणि साक्षी मलिक अशा पाच खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना पुढील स्पर्धामधील तयारीसाठी वार्षिक ३० लाख रुपये देण्यात येणार आहेत.