आता आभाळच फाटले आहे. त्याला कुठे कुठे ठिगळे लावायची? असेच विश्वविजेत्या आनंद आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाटत असेल. आता आनंदला पूर्वी राजपूत जसे केसरिया करायचे त्याप्रमाणे ‘जिंकू किंवा मरू’ या आवेशाने सुरुवात केली पाहिजे. आनंदने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी गाटा कॅमस्की याचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे. १९९४ साली आनंदने गाटाविरुद्ध सांघीनगरला झालेल्या लढतीत २ गुणांची आघाडी घेतली होती आणि डाव राहिले होते फक्त दोन! पण जिद्दी गाटाने दोन्ही डावांत आनंदला पराभूत करून बरोबरी साधली, इतकेच नव्हे तर टायब्रेकरच्या दोन्ही डावांत सहजी विजय मिळवून त्याने जगज्जेतेपदाची पुढची पायरी गाठली होती. सहसा अनुभवी खेळाडू डावाची गती संथ ठेवून तरुण खेळाडूंच्या घाईने केलेल्या चुकांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. चेन्नईमध्ये काही वेगळेच घडते आहे. तिथे तरुण मॅग्नस कार्लसन वजिरावजिरी करून आनंदच्या तंत्रातील चुकांवर विसंबून राहून एकापाठोपाठ विजय मिळवतो आहे. पुराणात उल्लेख आहे की, हनुमानाला आपल्या शक्तीची कल्पना नसे आणि त्याला जांबुवंताने सांगितल्यावर त्याने समुद्रापार उड्डाण करून सीतेचा शोध लावला होता. आता आनंदला कोणता जांबुवंत भेटणार, की जो त्याला सांगू शकेल, की आक्रमक हल्ले हा तुझ्या खेळाचा आत्मा आहे. तू आत्तापर्यंत याच आक्रमणाच्या जोरावर ५ जगज्जेतेपदे जिंकलीस आणि याच मॅग्नस कार्लसनला तू आसमान दाखवले होतेस. कालचा डाव बघताना ज्यांनी आनंदला जवळून पाहिले आहे, त्यांना प्रश्न आला होता की, मॅग्नसला लिनारेस आणि लंडन या दोन ठिकाणी स्पॅनिश प्रकारात मात देणारा आनंद हाच का? शनिवारी संपूर्ण डाव आनंद कल्पनाशक्ती हरवून बसल्यासारखा खेळला. एकदाच त्याने आपल्या प्रतिभेची भरारी दाखवली आणि क्षणभर मॅग्नस गडबडून गेला होता. ४४वी खेळी होती ती! आपले एक प्यादे कमी असताना दुसरे प्यादे देऊन जगज्जेता आपल्या राजाची कोंडी करेल हे मॅग्नसच्या स्वप्नातही नसावे. त्याने मनोमन आनंदच्या प्रतिभेला दाद दिली आणि अखेरचा सापळा रचला. दुर्दैवाने मनाने खचलेला आनंद त्या सापळ्यात शिरून मॅग्नसची दुसऱ्या वेळी शिकार झाला. आनंदच्या आक्रमणाचा धडाका सुरू झाला, की कार्पोव, ताल, स्पास्की यांसारख्या जगज्जेत्यांची हबेलंडी उडायची. फक्त आता सोमवारी डाव सुरू होईल त्या वेळी कॅमस्कीचे उदाहरण देऊन आनंदला आपल्या सामर्थ्यांची जाणीव करून देणारा कोणी जांबुवंत त्याला भेटेल का?