सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला ३९० धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपवलं नाही.

अवश्य वाचा – BLOG : काहीतरी गंडलंय हे नक्की फक्त विराटने ते मान्य करायला हवं !

टीम इंडियाच्या दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवर टीका केली आहे. “मला विराटची कॅप्टन्सी खरंच समजत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या संघावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळवणं गरजेचं आहे याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. अशावेळीही तुम्ही तुमच्या महत्वाच्या गोलंदाजाला फक्त दोन षटकं देता?? सर्वसाधारणपणे वन-डे क्रिकेमध्ये जलदगती गोलंदाज ४-३-३ च्या हिशोबाने स्पेल टाकतात. पण तुम्ही जर संघातल्या महत्वाच्या गोलंदाजाला केवळ दोन षटकं देऊन थांबवणार असाल तर खरंच विराटची कॅप्टन्सी न समजणारीच आहे. हे टी-२० क्रिकेट नाहीये.” ESPNCricinfo शी बोलत असताना गंभीरने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताने सामना गमावला पण सचिनचा विक्रम मोडण्यात विराट यशस्वी

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताच्या पराभवासाठी विराटने गोलंदाजांना ठरवलं जबाबदार, म्हणाला…

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – कांगारुंविरुद्ध कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-रोहितच्या पंगतीत मानाचं स्थान