स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाचे अनेक धक्के गेले महिनाभर भारतीय क्रिकेटला बसत आहेत. भारतीय क्रिकेट एका कठीण कालखंडातून जात असताना बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावरून राजीनामा द्यावा, ही मागणी करत अजय शिर्के यांनी कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. नव्या जबाबदारीनिशी कार्यरत झालेल्या सावंत यांनी आगामी मोसमाला सामोरे जाण्यासाठी मुंबईकरिता खास योजना आखल्या आहेत. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीपासून खेळाडूंना रोखण्यासाठी एमसीएनेही गांभीर्याने पावले उचलली आहेत. ‘‘स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीविषयी खेळाडूंना ज्ञान देण्याची आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असते. तुमचे आयुष्य, तुमची कारकीर्द यांचे कशा प्रकारे नुकसान होऊ शकते, त्याचे परिणाम काय घडू शकतात, याची जाणीव मुंबईच्या खेळाडूंना करून देण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. अजून हंगामाला प्रारंभ व्हायचा आहे. त्याआधी एक सत्र आणि त्यानंतर दर काही दिवसांनी खेळाडूंना मार्गदर्शन करणे अशी आमची योजना आहे,’’ असे सावंत यांनी सांगितले. बीसीसीआयचे कोषाध्यक्षपद आणि एमसीएचे अध्यक्षपद अशा महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या रवी सावंत यांच्याशी केलेली खास बातचीत-
भारतीय क्रिकेट कठीण परिस्थितीतून जात असताना बीसीसीआयचे कोषाध्यक्षपद तुमच्याकडे आले. या आव्हानाकडे तुम्ही कशा रीतीने पाहता?
मुंबईच्या क्रिकेटच्या प्रशासनात गेली अनेक वष्रे कार्यरत असल्यामुळे मी हे आव्हान मानत नाही. सध्या भारतीय क्रिकेट अतिशय चर्चेत आहे. त्यामुळे या परिस्थितीत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने काम करण्याचे आव्हान आहे. अन्यथा काम करणे हे मुळीच आव्हान नाही.
तुम्ही स्वत: व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहात. त्यामुळेच कोषाध्यक्ष पदासाठी तुमचा प्राधान्याने विचार केला गेला का?
तुमचे शिक्षण हे नक्कीच तुमच्या वाटचालीसाठी पूरक ठरते. मी चार्टर्ड अकाऊंटंट व्यवसायात आहे आणि क्रिकेटविषयक संघटनात्मक कामाचा १८ वर्षांचा अनुभव माझ्याकडे आहे. बीसीसीआयला कोषाध्यक्ष पदासाठी माहीतगार व्यक्तीची आवश्यकता होती. येत्या काही महिन्यांत बीसीसीआयची निवडणूक आहे, त्यासाठी ऑडिटसुद्धा पूर्ण करायचे आहे. या सर्व गोष्टींमुळे माझ्याकडे हे पद देण्यात आले असावे.
बीसीसीआय आणि एमसीएच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
बीसीसीआय आणि एमसीएच्या ठरावीक कालखंडाने निवडणुका होतच असतात, त्याच्या चर्चा घडतच असतात, यात काही वेगळे नाही. या निवडणुका होणार हे अटळच असते. वारे वाहू लागले असा विचार मी कधी केला नाही. काही मंडळी निवडणुकांचे वारे वाहायला लागले की ती जास्त कार्यरत होतात. मी माझे काम वर्षभर करीत असतो. त्यामुळे वारे वाहायला लागले की आता काम करूया, असा दृष्टिकोन मी बाळगत नाही. जे कार्य आपण हाती घेतले आहे, ते पूर्ण करायचे, हाच विचार मी बाळगतो.
एमसीएच्या प्रशासनाचा तुमच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. बीसीसीआयचे महत्त्वाचे पद भूषविताना त्याचा कसा फायदा होतो?
अनुभवाचा फायदा नक्कीच होतो. एकच पदवी घेतलेली माणसेसुद्धा विविध स्तरांवर यशस्वी होताना दिसतात. कारण जो अनुभव ते मिळवतात, त्यातूनच ती परिपक्व होतात. नुसती पदवी घेऊन परिपक्वता येत नाही.
नशीब हा घटक तुम्ही आयुष्यात किती महत्त्वाचा मानता?
जे काही आयुष्यात घडत आहे, ते नशीब म्हणायचे का, हे मला कळत नाही. पण खरेतर या प्रक्रिया आहेत. दोन्ही गोष्टी एकदम घडल्या किंवा वर्षभरातच घडल्या म्हणून तसे वाटू शकते. परंतु माणसाचा प्रामाणिकपणा आणि मेहनत हेसुद्धा महत्त्वाचे घटक असतात. नुसते नशिबामुळे आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडत नाहीत, त्यासाठी आपल्या कार्याविषयी प्रामाणिकपणा जोपासून मेहनतसुद्धा करावी लागते.
एमसीएच्या घटनेत बदल होणार अशी गेले काही दिवस चर्चा होते आहे, याविषयी काय सांगाल?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या घटनेत बदल करण्यासंदर्भात आमच्या काही बैठकांमध्ये चर्चा झाली. कोणताही कायदा किंवा नियम तुम्ही बनवता तेव्हा तो बदलत्या काळानुसार बदलतो. क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी अनपेक्षितपणे घडायला लागल्या आहेत. मग कोणतीही कारवाई करताना घटनेचे जुने नियम कमी पडत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे कोणताही प्रश्न न्यायालयात गेला की तिथे तुमचे काहीच चालत नाही. मग बरीच मंडळी तुमच्या घटनेत तरतूदच नसल्याचे कारण दर्शवून सहीसलामत सुटतात. त्यामुळे कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम अशी तुमची घटना हवी. या पाश्र्वभूमीवर संभाव्य समस्यांचे निराकरण त्यात असायला हवे, हा या नव्या घटनेमागचा आमचा हेतू आहे. पण काही मंडळी ‘तुम्ही कशाला घटनेत बदल करता? घडल्यानंतर बघू,’ असा उपदेश देत आहेत. एमसीएच्या कायदे सल्लागारांनी या नव्या घटनेची वाखाणणी केली आहे. तुम्ही खूप मेहनत केली असल्याची पोचपावतीही त्यांनी दिली आहे. पण हे व्यावसायिक मंडळींचे मत झाले. एमसीए सदस्यांची अनुकूलता त्यासाठी अधिक महत्त्वाची आहे.
शरद पवार, दिलीप वेंगसरकर ही दिग्गज मंडळी एमसीएच्या बहुचर्चित निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे चर्चेत आहे?
एमसीएच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक नावे आमच्याही कानावर येत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही भारतातील सर्वात मोठी संघटना आहे. इथे लोकशाही पद्धतीने दर दोन वर्षांनी निवडणुका होतात. एमसीएच्या घटनेची पूर्तता करणारा कोणताही सदस्य निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरू शकतो.
एमसीएच्या बदलापूर प्रकल्पाबाबत काय सांगाल?
मुंबईच्या क्रिकेटचा भौगोलिक आवाका मोठा आहे. परंतु मुंबईचे क्रिकेट हे दक्षिणेकडे केंद्रित झाले आहे. डहाणू, बदलापूर येथूनही मुले खेळायला येतात. त्याऐवजी या मुलांना तिथेच खेळण्यासाठी मैदान मिळाले, तर त्यांचा प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचेल. त्यामुळे या भागांमध्ये मैदाने विकसित करून तिथे स्पर्धा घेणे आणि या स्पध्रेतून पुढे आलेले संघ मग पुढच्या फेरीत मुंबईत खेळतील, अशा आमच्या योजना आहेत. मुंबईबाहेर स्पर्धात्मकता नसते म्हणून ही मुले इथे येतात असे काही जण म्हणतात. पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आवाका त्याहीपेक्षा मोठा आहे. गावागावांतूनही क्रिकेटपटू घडत आहेत. बदलापूर किंवा डहाणू हे फार अंतरावर नाहीत. त्यामुळे तेथील गुणवत्तेला योग्य न्याय हा मिळणारच.
आगामी हंगामाला सामोरे जाण्यासाठी मुंबईच्या कोणत्या योजना आहेत?
आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्व स्पर्धाची पुनर्रचना केली आहे. मुंबईत होणाऱ्या शंभराहून अधिक स्पर्धा या बाद फेरीच्या होत्या. या परिस्थितीत कोणता संघ कुठे खेळतोय, कधी आव्हान संपुष्टात आले, हेच समजेनासे होते. त्यामुळे निवड समितीच्या नजरेतून ही गुणवत्ता निसटू शकते. या पाश्र्वभूमीवर मुंबई क्रिकेटच्या वर्षभरातील स्पर्धाचा कार्यक्रम आम्ही आधीच घोषित करू. या स्पर्धा साखळी पद्धतीने असतील. हे संघ, त्यांचे खेळाडू आणि कामगिरी निवड समितीला नक्की पुन्हा पाहता येऊ शकणार आहे. कांगा लीगमधील प्रत्येक गटाला त्या विभागाच्या स्पध्रेचा दर्जा मिळेल. प्लेट गटातील विजेते आहेत, ते एलिटमध्ये येतील. प्रत्येक रविवारी सामने होतील आणि त्या संघाची कामगिरी पाहता येईल. याशिवाय मुंबईतील स्थानिक खेळाडूंच्या गुणवत्तेला न्याय देण्याकरिता फेब्रुवारी-मार्चमध्ये मुंबई प्रीमियर लीग स्पर्धा घेण्याचाही आमचा मानस आहे.