टेनिसजगतात सोमवारपासून आयपीएलच्या धर्तीवरील चॅम्पियन्स टेनिस लीगचे (सीटीएल) वारे वाहू लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या विजय अमृतराजप्रणीत या लीगमध्ये सहा संघांचा समावेश असून, नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या दिल्ली ड्रीम्स विरुद्ध पंजाब मार्शल्स यांच्यातील लढतीने स्पध्रेला प्रारंभ होणार आहे.
दिल्ली ड्रीम्सचे नेतृत्व जागतिक क्रमवारीतील माजी अग्रस्थानावरील खेळाडू एलिना जान्कोव्हिक करणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन त्यांच्या संघात आहे. पंजाब मार्शल्सने डेव्हिड फेररला जरी गमावले असले तरी लिएण्डर पेससारखा खेळाडू त्यांच्या संघात आहे.
प्रत्येक लढतीत एका सेटच्या पाच सामन्यांचा समावेश असेल. दिग्गजांचा एकेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि पुरुष एकेरी या क्रमाने हे सामने होतील. टायब्रेकर ६-६ ऐवजी ५-५ असा असेल. जो संघ सर्वाधिक सामने जिंकेल, तो विजेता होईल.
चॅम्पियन्स टेनिस लीगमधील संघ
दिल्ली ड्रीम्स, पंजाब मार्शल्स,
मुंबई टेनिस मास्टर्स, पुणे मराठा,
हैदराबाद एसेस, बंगळुरू रॅपटर्स.