आपल्याकडे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिबळपटू होऊन गेले, मात्र विश्वनाथन आनंद याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर या खेळाला आपल्या देशात लोकप्रियता वाढली, हे मत व्यक्त केले आहे महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे-तेली हिने.
बुद्धिबळाचे माहेरघर असलेल्या सांगलीची मूळ रहिवासी असलेल्या स्वाती हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच तिने अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. स्वाती आगामी महाराष्ट्र बुद्धिबळ प्रीमिअर लीगमध्येही खेळत आहे. आनंदने मिळविलेल्या यशानंतर या खेळात दिसून आलेल्या अमुलाग्र बदलांविषयी स्वाती हिने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीबरोबर संवाद साधला.
सुनील गावसकर किंवा सचिन तेंडुलकर या आदर्शवत खेळाडूंमुळे क्रिकेटमध्ये कारकीर्द करणाऱ्यांचे प्रमाण अफाट वाढले, तसा बुद्धिबळात आनंदमुळे बदल घडून आला का?
आनंद हा विश्वविजेता होण्यापूर्वी भारतात अनेक जण या खेळात आपले कौशल्य दाखवीत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र आनंदला जागतिक स्पर्धेत अव्वल दर्जाचे यश मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या खेळाबाबत सकारात्मक बदल घडत गेले. या खेळातही करिअर करता येते याची जाणीव दिसून येऊ लागली. आम्हीही आनंदला आदर्श मानत असलो, तरी कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका या महिला खेळाडूंनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आपला ठसा उमटविल्यानंतर त्यांचा आदर्श पुढे ठेवीत अनेक नवोदित खेळाडू महिला बुद्धिबळात कारकीर्द करण्याचा विचार करू लागल्या आहेत.
या खेळात गेली २० वर्षे तू आहेस. या कालावधीत तुला खेळात काय फरक जाणवत आहे?
प्रामुख्याने स्पर्धाची संख्या वाढली आहे आणि महिलांनाही या खेळात करिअर करण्याची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. मात्र अजूनही बुद्धिबळपटूंकरिता नोक ऱ्यांच्या संधी कमीच आहेत. तथापि विविध स्पर्धामधील पारितोषिकांच्या रकमेत भरघोस वाढ झाली आहे.  प्रशिक्षणाकरिता व परदेशातील स्पर्धामध्ये जाण्यासाठी प्रायोजक मिळू लागले आहेत. हल्ली १६-१७ वर्षांच्या खेळाडूंनाही काही कंपन्यांनी विद्यावृत्तिवेतन किंवा शिष्यवृत्ती सुरू केली आहे. अनेक युवा खेळाडू सात-आठ वर्षे कंत्राटदारीवर नोकरी करीत असतात. या तात्पुरत्या नोकरीचे कायमस्वरूपी नोकरीत रूपांतर झाले, तर खेळाडू निश्चिंत मनाने सराव करू शकतील.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आता आपल्या खेळाडूंना अधिक संधी मिळते आहे का?
हो निश्चितच. पूर्वी फक्त राष्ट्रीय विजेताच खेळाडू आशियाई किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी जात असे. आता त्याच्याबरोबरच देणगी प्रवेशिकेद्वारेही खेळाडूंना अशा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या खेळात अर्धा गुणही महत्त्वाचा असतो. साहजिकच केवळ अध्र्या गुणामुळे राष्ट्रीय विजेतेपद व पर्यायाने आशियाई किंवा जागतिक स्पर्धेची संधी हुकलेला खेळाडू देणगी प्रवेशिकेद्वारे या स्पर्धेत भाग घेऊ शकतो आणि विजेताही होऊ शकतो. या नवीन नियमामुळे लहान गटात एकेका वयोगटात दोन-तीन पदकांची कमाई भारतास होऊ लागली आहे.
प्रशिक्षण पद्धतीत काही बदल जाणवत आहे काय?
 पूर्वी व्यावसायिक प्रशिक्षक फारसे नव्हते. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्यासारख्या खेळाडूंनी आपल्या अनुभवातून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ते स्वत:हून जसे घडले, तसे खेळाडू घडविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. जी.रमेश किंवा विश्वेश्वरन आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठे यश मिळविले नसले, तरी ते चांगले प्रशिक्षक आहेत. ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या पिढीतील खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याची संधी मिळाली व त्याचा फायदा या खेळाडूंमधूनच चांगले प्रशिक्षक होण्यासाठी झाला.
आगामी बुद्धिबळ लीगविषयी काय सांगता येईल?
लीग स्पर्धेची संकल्पना खूप उत्साहवर्धक आहे. संदीपन चंदा यांच्यासारखे खेळाडू युरोपातील विविध लीग स्पर्धामुळेच घडले. चंदा याने १८-२० लीग स्पर्धामध्ये भाग घेतच ग्रँडमास्टरचा निकष पूर्ण केला. हरिका, हंपी, पी. हरिकृष्ण, के. शशिकिरण, सूर्यशेखर गांगुली यांच्यासह अनेक खेळाडू परदेशातील लीग स्पर्धेत भाग घेत असतात. महाराष्ट्र लीगमुळे खेळाडूंना आर्थिक फायदा मिळणार आहेच, पण त्याचबरोबर अनुभव म्हणून या स्पर्धेचा खूप उपयोग सर्वच खेळाडूंना होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी ठरली, तर नजीकच्या काळात अखिल भारतीय स्तरावरही अशी लीग स्पर्धा सुरू होईल आणि अनेक परदेशी खेळाडू त्यात भाग घेऊ लागतील. त्यामुळे आपोआपच भारतीय खेळाडूंच्या अनुभवात समृद्धता येईल.