मैदानात ठाण मांडून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना नामोहरम करणारा भारताचा आश्वासक कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने रांची कसोटीत द्विशतकी खेळी ठोकून टीम इंडियाचा डाव सावरला होता. संघ बिकट स्थितीत असताना पुजाराने भारताचा डाव सावरून आघाडी मिळवून देण्याचा मोलाची कामगिरी केली. यावेळी पुजाराने एकाच इनिंगमध्ये तब्बल ५०० चेंडूंचा सामना करून माजी कसोटीवीर राहुल द्रविडचाही विक्रम मोडीस काढला होता.

पुजाराने या विक्रमापाठोपाठ धरमशाला कसोटीतही नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाची रन मशिन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीलाही पुजाराने मागे टाकले आहे. कसोटी विश्वात एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम पुजाराने प्रस्थापित केला आहे. धरमशाला कसोटीत पहिल्या डावात १२ धावा करून पुजाराने एका हंगामात आतापर्यंत १,३१६ धावा ठोकण्याचा पराक्रमक केला आहे. पुजारा एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा भारतीय कसोटी फलंदाज ठरला आह. याआधी हा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर होता. गंभीरने २००८-०९ साली एका हंगामात १२६९ धावा केल्या होत्या.

पुजाराने आणखी १६९ धावा ठोकल्या तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे असलेला १४८३ धावांचा विक्रम तो मोडीस काढू शकेल. या कसोटी मालिकेच्या सुरूवातीला हा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहली सहज मोडीस काढेल असे सांगितले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहलीला धावा जमा करता आलेल्या नाहीत. अशावेळी पुजाराने धावांची टांकसाळ उघडत विक्रमी खेळी साकारली.

पुजारने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३७३ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडविरुद्ध ४०१ धावा ठोकल्या. यात दोन शतकांचा समावेश होता. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्याने ८३ धावांची खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत त्याने द्विशतकी कामगिरी केली.