ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला शेवटच्या भारतीय दौऱ्यात ०-४ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या दौऱ्यादरम्यान ‘होमवर्क गेट’ प्रकरण चांगलेच गाजले. ते प्रकरण आणि संपूर्ण दौराच कारकिर्दीतील खडतर टप्प्यांपैकी एक होता, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केले. पहिली कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे तत्कालीन प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी खेळाडूंना गृहपाठ करण्याचे आदेश दिले होते. हा गृहपाठ न केलेल्या चार खेळाडूंना दुसऱ्या कसोटीसाठीच्या संघातून वगळण्यात आले होते. या चार खेळाडूंमध्ये उपकर्णधार शेन वॉटसनचाही समावेश होता. ‘‘तो एक प्रसंग नाही, अनेक गोष्टी त्या काळात घडल्या. ऑर्थर यांनी काही कठोर निर्णय घेतले. मी त्या प्रक्रियेचा भाग होतो. मी त्यांना अनुमोदन दिले. त्याचा मला पश्चात्ताप नाही. ऑर्थर यांना माझा पाठिंबा होता. माझ्या मते जे काही घडले ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या भल्यासाठीच होते,’’ असे क्लार्कने सांगितले. त्या दारुण पराभवानंतर मिकी ऑर्थर यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. क्लार्कच्या नेतृत्व क्षमतेवरही जोरदार टीका झाली होती. मात्र माझ्यावर होणाऱ्या टीकेपेक्षा संघाच्या प्रतिमेची मला जास्त काळजी होती, असे क्लार्कने सांगितले.