कॉफी विथ करण या शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बंदीची शिक्षा भोगणारे हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आहे. CoA ने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ही बंदी तत्काळ प्रभावाने उठवण्यात आली असून न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित सामन्यांसाठी हे दोघे लवकरच टीम इंडियाच्या चमूत दाखल होणार आहेत. मात्र त्यांना चौकशीपासून पळता येणार नसून लोकपाल (होमडसमन) नेमल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पांड्या-राहुल प्रकरणी सुप्रीम कोर्टात ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी शो मध्ये काही विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI च्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात लक्ष घालत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अमिकस क्युरी पी एस नरसिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर CoA ने त्यांच्यावरील बंदी तत्काळ उठवण्याचा निर्णय घेतला. पांड्या आणि राहुल यांची चौकशी करण्यासाठी लोकपाल नेमण्याची गरज होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप लोकपाल नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे तात्पुरते हे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर पांड्या व राहुल या दोघांवर टिकेचा भडीमार झाला होता. कर्णधार विराट कोहलीने या सगळ्या प्रकाराबद्दल नापसंती दर्शवली होती. तर हरभजन सिंगनंही चांगलात खरपूस समाचार घेतला होता. पांड्या व राहुल ज्या बसमध्ये असतील त्या बसमधून प्रवासही करायला आपल्याला आवडणार असे हरभजन म्हणाला होता. “त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास गमावला आहे. जर पार्टीमध्ये तो आला आणि तुमच्याजवळ उभा राहिला तर तुम्हाला आवडेल का? त्यांच्यासह प्रवास करणं मला आवडणार नाही कारण टीमच्या बसमध्ये माझी मुलगी किंवा पत्नी असेल तर कसं वाटेल? तुम्ही महिलांकडे कुठल्या नजरेनं बघता? झालं ते अत्यंत अयोग्य आहे,” अशा शब्दांमध्ये हरभजननं आपला संताप व्यक्त केला होता.

क्रिकेटमध्ये अनेक दशकं घालवलेल्या दिग्गज खेळाडुंच्या प्रतिमांना पांड्याच्या वक्तव्यामुळे तडा गेल्याची भावना काही खेळाडुंनी व्यक्त केली होती.