कोपा अमेरिका शतकमहोत्सवी फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या अन्य संघांपेक्षा कोलंबियाचा प्रवास अतिशय खडतर होता. चिलीने आव्हानात्मक संघाविरुद्ध सुरुवात करूनही नंतर आपल्या आक्रमणाचा आणि बचावाचा रुबाब कायम राखला. त्यामुळेच कोलंबियाची गुरुवारी होणारी ‘चिली’परीक्षा उत्कंठावर्धक ठरणार आहे.

कोलंबियाने अमेरिकेचा २-० असा पराभव करून विजयी सलामी नोंदवली. मग पहिल्या सत्रातील दमदार कामगिरीच्या बळावर पेराग्वेला २-१ असे हरवले. त्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत कोस्टा रिकाने कोलंबियाचा ३-२ असा पाडाव केला. मग उपांत्यपूर्व फेरीच्या थरारक शूटआऊटमध्ये कोलंबियाने पेरूला ४-२ असे हरवले आणि अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवले आहे. कोलंबियाची मदार आहे ती जेम्स रॉड्रिगेझवर. अगदी पेरूविरुद्धच्या शूटआऊटमध्ये पहिला प्रयत्न जेम्सनेच यशस्वी ठरवला. आतापर्यंत या स्पध्रेत त्याने दोन गोल झळकावले आहेत, तर एका गोलला साहाय्य केले आहे.

चिलीला पहिल्याच लढतीत अर्जेटिनासारख्या दिग्गज संघाकडून २-१ अशी हार पत्करावी लागली. त्यातून सावरत त्यांनी बोलिव्हियाला २-१ असे पराभूत केले. मग अखेरच्या साखळीत पनामाचा ४-२ असा पराभव केला. उपांत्य फेरीत चिलीने मेक्सिकोचा ७-० असा धुव्वा उडवला. एडय़ुडरे व्हर्गासने या स्पध्रेत अप्रतिम गोल साकारले आहेत. मात्र तरीसुद्धा चिलीची अ‍ॅलेक्सिस सांचेझवर भिस्त असेल.

गुरुवारचा सामना

  • कोलंबिया वि. चिली
  • वेळ : पहाटे ५.३० वाजता
  • थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएऩ, सोनी ईएसपीएन एचडी.