वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड म्हटलं की कोणत्याही क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यापुढे येतात उत्तुंग षटकार. पोलार्ड आणि फटकेबाजी यांचं नातं अत्यंत जवळचं आहे. IPLमध्ये मुंबई इंडियन्सकडून १० वर्षांपेक्षाही जास्त काळ सातत्याने खेळणारा पोलार्ड सध्या अबुधाबी टी१० लीग स्पर्धेत आपला जलवा दाखवत आहे. ३० जानेवरीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत डेक्कन ग्लॅडिएटर्स आणि दिल्ली बुल्स या दोन संघांमध्ये सोमवारी सामना झाला. सामन्यात ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पोलार्डने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचत १८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.

पाहा पोलार्डची फटकेबाजी-

पोलार्डने फटकेबाजी केली असली तरी त्याच्या संघाला विजय मिळवता आला नाही. पोलार्डच्या ४७ धावांच्या जोरावर डेक्कन ग्लॅ़डिएटर्स संघाने १० षटका ७ बाद ११८ धावांपर्यंत मजल मारली. अली खानने २ षटकांत केवळ ४ धावा देत २ बळी टिपले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली बुल्स संघाने ८ गडी आणि ११ चेंडू राखून सामना जिंकला. दिल्ली बुल्सकडून रहमनुल्लाह गुरबाझने २० चेंडूत ४७ धावा केल्या. पण अली खानला अप्रतिम गोलंदाजीसाठी सामनावीर निवडण्यात आले.