कॅरेबियन बेटांवर मंगळवारपासून कॅरेबियन प्रिमियर लीग टी२० स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्रिनबॅगो नाईट रायडर्स आणि गतविजेता बार्बाडॉस ट्रायडंट्स या संघांनी अनुक्रमे गयाना अमेझॉन वॉरियर्स व सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियॉट्सचा पराभव केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच्या सामन्यात जमैका तलायव्हाज संघाने सेंट लुसिया झोक्सला पराभूत केले. रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली तलायव्हाजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झोक्सने पहिले फलंदाजी करत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. या सामन्यात तलायव्हाजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि फिरकीपटू वीरसामी परमॉल यांची सीमारेषेवर जोरदार टक्कर झाली.

पाहा तो व्हिडीओ-

१५व्या षटकात नजीबुल्लाह झादरान फलंदाजी करत होता. तलायव्हाजकडून फिरकीपटू संदीप लामिचन्नेने चेंडू टाकला. फलंदाजाने चेंडू हवेत उंच मारला. झादरानचा फटका अचूकपणे न बसल्याने चेंडू सीमारेषेपाच्या आतच राहिला. त्यावेळी एकीकडून पॉवेल आणि दुसरीकडे परमॉल झेल पकडण्यासाठी धावत आले. दोघांच्या नजरा आकाशातील चेंडूकडे असल्याने दोघांची जोरदार टक्कर झाली. टक्कर झाल्यावर दोघेही विचित्र पद्धतीने जमिनीवर धडपडले. पण त्यात महत्त्वाची बाब म्हणजे पॉवेलने तो झेल टिपला. सुदैवाने दोघांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. पॉवेलच्या या झेलाचे नंतर साऱ्यांनीच कौतुक केले.

दरम्यान, सेंट ल्युसिया झोक्सकडून रॉस्टन चेसने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तर परमॉल आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी टिपले. त्यानंतर आसिफ अलीच्या सर्वाधिक नाबाद ४७ धावांच्या खेळीने जमैका तलायव्हाज विजयी संघ ठरला. केजरिक विल्यम्सने २ बळी घेतले.