सलग तिसऱ्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर्सनी भारतासाठी पदकं मिळवण्याचा सिलसिला कायम राखला आहे. सकाळी सतिश कुमार शिवलिंगमने भारतासाठी ७७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. यानंतर टेबल टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्येही भारतीय संघाने चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला जलतरणपटू सजन प्रकाशने २०० मी. बटरफ्लाय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र अंतिम फेरीत त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. याव्यतिरीक्त सायकलिंग, बास्केटबॉल या खेळांमध्येही भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

यानंतर शेवटच्या मेडल इव्हेंटमध्ये ८५ किलो वजनी गटात भारताच्या वेंकट राहुल रगालाने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकलं. अखेरच्या क्षणापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत राहुलने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आतापर्यंत भारताच्या खात्यात ४ सुवर्णपदकं जमा झालेली आहेत. सध्या पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

  • पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर
  • वेंकट राहुल रगालाला अटीतटीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक, भारताच्या खात्यात ४ सुवर्णपदकं
  • ८५ किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक
  • महिला व पुरुष बास्केटबॉल प्रकारात भारताचे संघ पराभूत
  • २०० मी. बटरफ्लाय अंतिम फेरीत जलतरणपटू सजन प्रकाशला अपयश
  • टेबल टेनिस – भारतीय महिला व परुष संघ उपांत्य फेरीत दाखल, मलेशियावर ३-० ने केली मात
  • बॉक्सिंग ६० किलो वजनी गटात सरिता देवी पुढच्या फेरीत दाखल
  • भारतासाठी आनंदाची बातमी, जलतरणपटू सजन प्रकाश २०० मी. बटरफ्लाय प्रकाराच्या अंतिम फेरीत
  • १५ किमी सायकलिंगमध्ये भारताचा मनजित सिंह पहिल्याच फेरीत बाद
  • दुसरीकडे ६३ किलो वजनी गटात पदक मिळवण्यात वंदना गुप्ता अपयशी, अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर
  • पहिल्याच सामन्यात भारताला बरोबरीवर समाधान मानावं लागणार, भारत २ – पाकिस्तान २
  • भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी – अखेरच्या सेकंदात पाकिस्तानीच सामन्यात बरोबरी
  • मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात १०४ किलोचं वजन उचलण्यात वंदना पुन्हा अपयशी
  • क्लीन अँड जर्क प्रकारात पहिल्या प्रयत्नात वंदनाला यश, १०२ किलोचं वजन यशस्वीपणे उचललं
  • मात्र तिसऱ्या संधीचं सोनं करत वंदना पदकाच्या शर्यतीत कायम, तिसऱ्या संधीत उचललं ८० किलो वजन
  • ६३ किलो वजनी गटात भारताच्या वंदना गुप्ताकडून पहिल्या दोन संधी हुकल्या
  • भारतीय बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत, मॉरिशीयसवर ३-० ने केली मात
  • भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष संघाची टेबल टेनिसमध्ये मलेशियावर ३-० ने मात
  • स्क्वॅशच्या उपांत्यपूर्व फेरीतून दिपीका पल्लीकलची माघार, भारताची एका पदकाची आशा समाप्त
  • ३१७ किलो वजन उचलत सतिश शिवलिंगमचा नवीन विक्रम
  • अखेर सतीश कुमार शिवलिंगमच्या नावावर सुवर्णपदक, भारताचं स्पर्धेतलं तिसरं सुवर्णपदक
  • पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये सतिश शिवलींगमने यशस्वीरित्या वजन उचललं, भारताची पदकाची आशा वाढली
  • ७७ किलो वजनी गटात भारताच्या सतिश कुमार शिवलिंगमची कडवी झुंझ