बहिष्काराच्या पवित्र्यामुळे तोडगा काढण्यासाठी भारताशी चर्चेची तयारी

बर्मिगहॅम येथे २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी क्रीडा प्रकाराला वगळल्याच्या निषेधार्थ भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बहिष्काराचा पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे धाबे दणाणले आहेत.

भारताने या स्पर्धेत निश्चितपणे सहभागी व्हायला हवे. नेमबाजीला वगळल्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आम्ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊ, असे आश्वासन रविवारी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने दिले आहे.

‘‘भारताने बर्मिगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे, या हेतूने महासंघाचे पदाधिकारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेतील. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या या बैठकीत नेमबाजीसंदर्भात चर्चा केली जाईल,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक टॉम डेगून यांनी सांगितले.

नेमबाजीला २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळल्याबद्दल बहिष्काराच्या प्रस्तावाबाबत चर्चेसाठी ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी शनिवारी क्रीडा मंत्री किरेन रिजूजी यांना पत्र लिहिले होते. ‘आयओए’ने सप्टेंबर महिन्यात रवांडा येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी होणाऱ्या निवडणुकीसाठीची नामनिर्देशन पत्रे ‘आयओए’चे सरचिटणीस राजीव मेहता (विभागीय उपाध्यक्ष पदासाठी) आणि नामदेव शिरगावकर (क्रीडा समिती सदस्य पदासाठी ) यांनी मागे घेतली आहेत.

‘‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या सर्वसाधारण सभेला हजर न राहण्याचा भारताचा निर्णय हा निराशाजनक आहे. या सभेमध्ये राष्ट्रकुल क्रीडा चळवळीच्या आगामी धोरणांबाबत चर्चा होते आणि ७१ सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी ती संमत करतात,’’ असे डेगून यांनी सांगितले.

‘‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे नेमबाजीला वगळण्याचे धोरण हे भारतविरोधी आहे. भारताने जेव्हा कामगिरी उंचावली, तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेच्या नियमांत बदल केले जातात,’’ अशा शब्दांत बत्रा यांनी शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा महासंघावर टीका केली होती.

भारतीय नेमबाजी संघटनेकडून पाठिंबा

नेमबाजीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळल्याबद्दल स्पर्धेवरच बहिष्कार घालण्याच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रस्तावाला भारतीय नेमबाजी संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. ‘‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्काराच्या प्रस्वाताला आमचा पाठिंबा राहील. कारण भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आम्ही सदस्य आहोत,’’ असे भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले.