टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा

टाटा स्टील जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेतील दुसरा दिवस पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदसाठी संमिश्र स्वरूपाचा ठरला. शनिवारी त्याने एक विजय मिळवला, एक सामना गमावला, तर एका सामन्यात बरोबरीत समाधान मानले.

‘ग्रँड चेस टूर’ स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा प्राप्त झालेल्या या स्पर्धेत नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन तीन गुणांच्या फरकाने आघाडीवर आहे. जलद प्रकाराच्या तीन आणि अतिजलद प्रकाराच्या १८ फेऱ्या बाकी असताना कार्लसनच स्पर्धेवर वर्चस्व गाजवण्याची चिन्हे आहेत. कार्लसनने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे हिकारू नाकामुरा (अमेरिका) आणि अनिश गिरी (हॉलंड) यांना नामोहरम केले, तर भारताच्या विदित गुजराथीने त्याला बरोबरीत रोखले.

कार्लसनने १२ पैकी १० गुणांची कमाई करीत अग्रस्थान राखले आहे, तर नाकामुरा आणि वेस्ले सो प्रत्येकी ७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आनंद, डिंग लिरेन (चीन) आणि गिरी हे तिघे प्रत्येकी ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. हरिकृष्णा, गुजराथी आणि अरोनियन प्रत्येकी ५ गुणांनिशी सातव्या स्थानावर आहेत.