सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीराबाइ चानूच्या कारकीर्दीचे पाठीच्या दुखापतीमुळे नुकसान झाले. या दुखापतीचे योग्य निदान होऊ न शकल्यामुळे २४ वर्षीय मीराबाईला आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला मुकावे लागले.

‘‘दुखापतीमुळे बरेच बदल झाले. त्यामुळे आता दुखापत झाली तर काय घडेल, ही भीती सतत मला वाटत असते. आता प्रत्येक सराव सत्रात वजन उचलताना हे दडपण माझ्यावर असते, म्हणून विचारपूर्वक निर्णय घेते,’’ असे मीराबाईने सांगितले.

दुखापतीमुळे नऊ महिने स्पर्धात्मक वेटलिफ्टिंगमधून बाहेर फेकल्या गेलेल्या मीराबाईने मग यशस्वी पुनरागमन केले. थायलंडमध्ये झालेल्या ईगॅट चषक स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. या दुखापतीमुळे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सराव सत्रात बदल केल्याचे सांगितले. माझा दृष्टिकोन आता बदलला आहे. कारण सुरुवातीला दुखापतीचे स्वरूप उमजत नाही, असे मीराबाईने सांगितले.